उल्हासनगर महापालिका स्थापना दिवस होणार साजरा; २० व २१ ऑक्टोबर रोजी रंगारंग कार्यक्रम
By सदानंद नाईक | Published: October 4, 2022 06:00 PM2022-10-04T18:00:38+5:302022-10-04T18:01:25+5:30
20 आणि 21 ऑक्टोबर रोजी उल्हासनगर महापालिका स्थापना दिवस साजरा होणार आहे.
उल्हासनगर: महापालिका स्थापना दिनाचे औचित्य साधून शहरात प्रथमच २० व २१ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिली. महापालिका अधिकारी व कर्मचारी, राजकीय नेते, माजी नगरसेवक, पक्ष पदाधिकारी, पत्रकार आदीजन कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.
उल्हासनगर महापालिकेची स्थापना २१ ऑक्टोबर १९९६ साली झाली असून गेल्या २६ वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. मात्र मूलभूत समस्या कायम आहेत. भुयारी गटार योजना, पाणी टंचाई, डम्पिंग प्रश्न, सफसफाईचा वाजलेला बोजवारा, रस्त्याची दुरावस्था, धोकादायक इमारती, अवैध बांधकामे, आरोग्याबाबत अनास्था आदी समस्या कायम आहेत. महापालिका स्थापनेनंतर शिवसेना आघाडीची सत्ता येऊन पाहिला महापौराचा मान शिवसेनेचे गणेश चौधरी यांना मिळाला. मात्र त्यानंतर महापालिकेवर बहुतांश वेळा शिवसेना मित्र पक्षाची सत्ता राहिली. शहराचा स्थापना दिवस दरवर्षी साजरा केला जातो. मात्र यावेळी प्रथमच महापालिका स्थापना दिवस आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या संकल्पनेतून दोन दिवस साजरा होणार आहे.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी सोमवारी महापालिका अधिकारी व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन महापालिका स्थापना दिवसा निमित्त विविध कार्यक्रमांसह उपक्रम साजरा करण्यात येणार असल्याची संकल्पना मांडली. २० व २१ ऑक्टोबर रोजी रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून महापालिका अधिकाचऱ्यासह कर्मचारी, पत्रकार, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. क्रिकेट स्पर्धा, बॅटमिंटन, गायन स्पर्धा, कथाकथन, कविता वाचन यासह अनेक कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता देशमुख यांनी दिली. तसेच शहर विकासा बाबतही यावेळी चर्चा होणार आहे. आयुक्त अजीज शेख यांच्या महापालिका स्थापना दिवस निमित्ताची संकल्पना बहुतांश जणांना आवडली असून आयुक्तांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.