उल्हासनगर मनपा मुख्यालयाला मिळाली हक्काची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 01:31 AM2020-02-03T01:31:14+5:302020-02-03T01:31:36+5:30
तरणतलावाचा मालकी हक्क मिळाला
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका मुख्यालयाच्या जागेसह तरणतलाव आणि गोलमैदानाच्या जागेचा मालकी हक्क राज्य शासनाकडून महापालिकेला हस्तांतरण करण्यात आला. महापालिकेच्या ताब्यातील सर्वच मालमत्तेचे मालकी हक्क एकाच वेळी हस्तांतर करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख आणि सभागृह नेते राजेंद्र चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
उल्हासनगरातील जागेचा मालकी हक्क राज्य शासनाकडे असल्याने शहर विकासासाठी अडसर ठरत आहे. महापालिका मुख्यालय ज्या जागेवर उभे आहे, त्या जागेची मालकी राज्य शासनाकडे आहे. मुख्यालयाच्या जागेसह गोलमैदान आणि तरणतलाव तसेच इतर जागेची मालकी महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा पाठपुरावा प्रांत कार्यालयामार्फत नगररचनाकार विभाग आणि मालमत्ता विभागाने केला. अखेर, त्याला यश येऊन मुख्यालयाच्या जागेसह तरणतलाव आणि गोलमैदानाच्या जागेची मालकी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.
प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांनी याबाबतची कागदपत्रे आयुक्तांकडे दिली आहेत. यापूर्वी आयडीआय कंपनीजवळील कबरस्तानसाठी देण्यात आलेला भूखंड, व्हीटीसी मैदान, हिराघाट बोटक्लब अशा चार भूखंडांची मालकी पालिकेला मिळाली होती. उल्हासनगरातील जागेचा मालकी हक्क पालिकेकडे हस्तांतरण करायला हवा. तसे न झाल्याने, शहरात अवैध बांधकामांचा प्रश्न उभा राहून शहर विकास ठप्प पडल्याची टीका होत आहे. जागेच्या विकासाबाबत प्रत्येकवेळी शासनाची मंजुरी घ्यावी लागत असल्याने, आजही ९० टक्के शहरवासीयांकडे मालकी नाही.
उल्हासनगर महापालिका ताब्यातील उद्याने, मैदाने, समाजमंदिरे, खुल्या जागा, प्रभाग समिती कार्यालयांसह इतर कार्यालयांच्या जागेचा मालकी हक्क एकाच वेळी हस्तांतरण करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे केली.