उल्हासनगर महापालिका कनिष्ठ अभियंताकडे थेट शहर अभियंता व कार्यकारी अभियंता पद, तर उपअभियंता साईडला
By सदानंद नाईक | Published: June 25, 2024 04:55 PM2024-06-25T16:55:03+5:302024-06-25T16:55:49+5:30
महत्वाच्या शहर अभियंता पदावर उपअभियंत्याला डावलून थेट कनिष्ठ अभियंताकडे पदभार दिल्याने, महापालिका कारभारावर सर्वस्तरातून टीका होत आहे.
उल्हासनगर : महापालिकेत शासन प्रतिनियुक्तीवर अधिकारी देत नसल्याने, वर्ग-१ व २ पदाचा पदभार लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे दिल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महत्वाच्या शहर अभियंता पदावर उपअभियंत्याला डावलून थेट कनिष्ठ अभियंताकडे पदभार दिल्याने, महापालिका कारभारावर सर्वस्तरातून टीका होत आहे.
उल्हासनगर महापालिकेत शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, वैधकीय अधिकारी, महापालिका सचिव, विधी अधिकारी, सहायक आयुक्त आदी वर्ग-१ व २ ची बहुतांश पदे शासन प्रतिनियुक्तीवर अधिकारी देत नसल्याने, ते पदे रिक्त आहेत. या महत्त्वाच्या पदाचा पदभार लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे दिल्याने, महापालिकेत सावळागोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिले जात नसल्याने, या महत्वाची पदे रिक्त राहू नये म्हणून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर विविध महत्वाच्या पदाचा प्रभारी पदभार दिला जात आहे. शहर अभियंता व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पदाचा पदभार उपअभियंता यांना डावलून थेट कनिष्ठ अभियंता यांच्याकडे दिला आहे.
महापालिकेच्या शहर अभियंता व बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी येत नसल्याने, या दोन्ही पदाचा पदभार उपअभियंता असलेले संदीप जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान तब्येतीच्या कारणास्तव ते वैधकीय सुट्टीवर गेले होते. त्यावेळी शहर अभियंता व कार्यकारी अभियंता या पदाचा प्रभारी कनिष्ठ अभियंता तरुण सेवकांनी यांच्याकडे दिला. उपअभियंता असलेले संदीप जाधव हे ३ जून रोजी महापालिका सेवेत वैधकीय प्रमाणपत्र देऊन रुजू झाले. उपअभियंता असल्याने त्यांच्याकडे शहर अभियंता व कार्यकारी अभियंता पदाचा पदभार देणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न होता त्यांना कनिष्ठ अभियंता सेवकांनी यांच्या हाताखाली काम करावे लागत असल्याचे चित्र महापालिकेत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यावर अन्याय?
महापालिका करनिर्धारक व संकलक व पाणी पुरवठा विभागात उपअभियंता यांना डावलून कनिष्ठ अभियंताकडे विभागाचा प्रभारी पदभार दिला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागत आहे. अन्य विभागातही हीच परिस्थिती असून याविरोधात कोणताही अधिकारी आवाज उठवीत नाही.
आयुक्त-महापालिका अजीज शेख म्हणाले की, "महापालिका उपअभियंता संदीप जाधव यांच्याकडे शहर अभियंता व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी पदभार दिला होता. दरम्यान जाधव वैधकीय रजेवर गेल्यावर शहर अभियंता व कार्यकारी अभियंता पदाचा पदभार कनिष्ठ अभियंता यांच्याकडे दिला आहे".