उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाची फक्त ६५ कोटी वसुली, विभागावर प्रश्नचिन्हे
By सदानंद नाईक | Published: April 1, 2023 06:10 PM2023-04-01T18:10:28+5:302023-04-01T18:10:38+5:30
गेल्या वर्षी हीच वसुली १०९ कोटी असल्याची माहिती करनिर्धारक संकलक जेठानंद करमचंदानी यांनी दिली आहे.
उल्हासनगर - महापालिका मालमत्ता कर विभागाला १४० कोटीचे वसुली टार्गेट दिले असताना, विभागाने ३१ मार्च पर्यंत फक्त ६५ कोटीची वसुली केल्याने, सर्वस्तरातून विभागावर टीकेची झोळ उडाली. गेल्या वर्षी हीच वसुली १०९ कोटी असल्याची माहिती करनिर्धारक संकलक जेठानंद करमचंदानी यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका आर्थिक कोंडीत सापडली असून मालमत्ता कर व पाणी पुरवठा कर वसुलीच्या उत्पन्नावर महापालिकेचा आर्थिक डोलारा उभा आहे. याव्यतिरिक्त शासन विविध अनुदाने, नगररचनाकार विभाग हेही उत्पन्नाचे साधने आहेत. गेल्या वर्षी महापालिकेला मालमत्ता कर विभागाकडून १०९ कोटीचे उत्पन्न वसूल झाले होते. गेल्या वर्षीचे उत्पन्न गृहीत धरून सन-२०२२ ते २३ वर्षात १४० कोटीच्या वसुलीचे टार्गेट विभागाने ठेवले होते.
दरम्यान, भांडवली मूल्यामुळे दिवाळी पर्यंत मालमत्ता कर बिलाचा घोळ सुरू होता. दिवाळीपूर्वी भांडवली मूल्य मालमत्ता कर वसुली रद्द केल्यावर, महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना सुरू केली. मात्र शहरवासीयांनी अभय योजनेला कोणताही थारा दिला नसल्याने, अभय योजना अपयशी ठरली.
महापालिका मालमत्ता कर विभागाला कमीतकमी ११० कोटीचे वसुली टार्गेट दिले. मात्र विभागावर कोणाचेही नियंत्रण न राहिल्याने, वसुलीवर सुरवाती पासून प्रश्नचिन्हे उभे ठाकले. मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त प्रियांका राजपूत, करनिर्धारक जेठानंद करमचंदानी आदीं अधिकाऱ्यांनी १ लाखा पेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची यादी तयार करून कारवाई सुरू केली. ६५० पेक्षा जास्त थकबाकीधारक मालमत्ताना नोटिसा देऊन काहींच्या मालमत्ता सील केल्या.
मात्र कारवाई करूनही ३१ मार्च अखेर ६५ कोटींची वसुली झाली. कॅम्प नं-५ नेताजी चौकातील बँक ऑफ इंडिया या बँकवरील सील कारवाई महापालिकेच्या अंगलट आले. मात्र ३१ मार्च पर्यंत वसुली टार्गेटच्या निम्म्यावरूनही कमी वसुली, झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्याच्या धोरणामुळे गेल्या वर्षी पेक्षा ४३ कोटी वसुली कमी झाल्याचे उघड झाले. आयुक्त अजीज शेख यांनीही कमी वसुलीवर नाराजी व्यक्त केली.