उल्हासनगर महापालिका शाळा पुनर्बांधणी कासव गतीने
By सदानंद नाईक | Published: February 20, 2024 08:50 PM2024-02-20T20:50:39+5:302024-02-20T20:50:46+5:30
तीन महिन्यात नुसते खोदकाम.
उल्हासनगर : खेमानी येथील महापालिका शाळा क्रं-१८ व २४ च्या इमारतीच्या पुनर्बांधणीला गेल्या ७ वर्षानंतर मुहूर्त लागला आहे. मात्र पुनर्बांधणीचे काम संथ गतीने सुरू असल्याने, शाळा इमारत कधी उभी राहणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांसह समाजसेवक प्रवीण माळवे यांनी केला.
उल्हासनगर महापालिकेने शाळा पुनर्बांधणीच्या नावाखाली खेमानी येथील शाळा क्रं-१८ व २४ ची इमारत ७ वर्षांपूर्वी जमीनदोस्त केली. तेंव्हा पासून शाळा इमारतीच्या पुनर्बांधणीला मुहूर्त लागला नाही. शाळेतील हजारो मुले एका खाजगी शाळेच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. स्थानिक मुलांना ही शाळा लांब पडत असल्याने, असंख्य विद्यार्थांनी शाळेला सोडचिट्ठी दिली. तर काही मुलांनी इतर शाळेत प्रवेश घेतला. त्यामुळे शाळेतील पटसंख्या अर्धीही राहिली नाही. असा आरोप समाजसेवक प्रवीण माळवे यांनी केला. शाळेची पुनर्बांधणी लवकर होण्यासाठी माळवे यांनी सतत ७ वर्ष महापालिकेसह वरिष्ठ अधिकाऱ्या सोबत पाठपुरावा केला होता. अड्डीच महिन्यांपूर्वी शाळा पुनर्बांधणीचे ऑनलाईन उदघाटन झाले असून शाळा इमारतीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र शाळा इमारतीचे काम याच गतीने सुरू राहिल्यास, बांधकाम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारीत आहेत.
खेमानी येथील महापालिका शाळा क्रं-१८ व २४ व चोपडा येथील शाळा क्रं-१७ ची इमारत तसेच अभ्यासिकेचे एकाच दिवशी ऑनलाइन भूमिपूजन झाले होते. मात्र शाळा क्रं-१७ च्या इमारतीचे काम उभारणीला आले. तर दुसरीकडे खेमानी येथील शाळेचा पायाभरणीच सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी खेमानी शाळा इमारत उभी करण्याची मागणी स्थानिक नागरिक व समाजसेवक प्रवीण माळवे यांनी लावून धरली आहे. नवीन इमारती मध्ये शाळा सुरू झाल्यास, शाळेत मुलांची संख्या वाढण्याची माहिती स्थानिक नागरिक देत आहेत.
महापालिका शाळा इमारतीला मुहूर्त
महापालिका शिक्षण विभागाच्या लेखा अधिकारी नीलम कदम यांनी शाळा क्रं-१८ व २४ च्या इमारतीची पुनर्बांधणीला सुरवात झाल्याची माहिती दिली. पावसाळयापूर्वी इमारत उभी राहण्याचे संकेत कदम यांनी देऊन इतर शाळा इमारतीची पुनर्बांधणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.