उल्हासनगर महापालिकेची शाळा भरते टेरेसवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 01:47 AM2019-11-28T01:47:26+5:302019-11-28T01:47:45+5:30
महापालिका शाळा क्रमांक १८ व २४ मधील तब्बल ९५० विद्यार्थी एका खाजगी शाळेच्या टेरेसवर धडे गिरवित असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका शाळा क्रमांक १८ व २४ मधील तब्बल ९५० विद्यार्थी एका खाजगी शाळेच्या टेरेसवर धडे गिरवित असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुनर्बांधणीसाठी शाळा इमारत जमीनदोस्त केली असून, आयुक्तांनी बांधकाम परवानगीही रद्द केल्याने इमारतबांधणीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळ नेहमी वादात राहिले असून, मंडळातील अनेक निविदांच्या चौकशीची मागणी वेळोवेळी झाली आहे. यापूर्वीच्या प्रशासन अधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाल्याने, शिक्षण मंडळात प्रशासन अधिकारी म्हणून कायमस्वरूपी काम करण्यास कोणी धजावत नाही. गेल्यावर्षी महापालिका शाळा क्रमांक १८ व २४ च्या इमारत पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार शाळेतील ९५० विद्यार्थ्यांना पुरेशी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षण विभाग व पालिकेची आहे.
प्रत्यक्षात तसे झाले नाही. उन्हाळी सुटीत विनापरवाना शाळा इमारत पालिकेने जमीनदोस्त केली. त्यानंतर मराठी व हिंदी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शेजारील खाजगी एसईएस शाळेच्या इमारतीत हलविण्यात आले. त्याठिकाणी पुरेसे वर्ग उपलब्ध नसल्याने, इमारतीच्या टेरेसवर कापडी छत टाकून त्याखाली शाळा भरविण्यात येत आहे.
खाजगी शाळेच्या टेरेसवर भरविण्यात येत असलेल्या या शाळेतील मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून महापालिकेने पुरेशी जागा वर्गासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
टेरेसवरून एखादे मूल पडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. शाळा इमारतीचे काम ठेकेदाराने सुरू केल्यावर सदर इमारत नवीन विकास आराखड्यानुसार लिंक रोडवर येत असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्या आहेत.
आयुक्तांनी शाळा इमारतीचा परवाना रद्द केल्याने, शाळा इमारतीच्या पुनर्बांधणीवरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. शाळा इमारत नवीन विकास आराखड्यात लिंक रस्त्यावर येत असल्याचे माहिती असून इमारत बांधकाम परवाना दिला कसा, शाळेची इमारत कोणाच्या आदेशान्वये पाडली, आदी अनेक प्रश्न निर्माण झाले. हिंदी माध्यमाची मुले महापालिका शाळा क्रमांक ३ मध्ये हलविणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांनी दिली आहे. मात्र शाळा लांब असल्याने अनेक विद्यार्थी शाळा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सर्व काही ठेकेदारासाठी
महापालिका शाळा इमारत पुनर्बांधणीचा घाट फक्त ठेकेदाराच्या भल्यासाठी घातला जात असल्याचा आरोप यानिमित्ताने होत आहे. यापूर्वीची शाळा इमारत पुनर्बांधणी वादात सापडली असून, त्याच्या चौकशीची मागणीही होत आहे.
ठेकेदाराच्या फायद्यासाठी पुनर्बांधणीच्या आड शाळा इमारत पाडून ९५० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून, आयुक्तांनी यातून मार्ग काढण्याची, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.