उल्हासनगर महापालिका परिवहन समिती बरखास्त?; नागरिकांचे बससेवेचे स्वप्न भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 05:43 PM2021-02-10T17:43:50+5:302021-02-10T17:44:08+5:30
परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकाकडून होत असल्याने, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : ठप्प पडलेली महापालिका परिवहन बस सेवा गेल्या ४ वर्षांपासून सुरू करण्यात अपयश आल्याने परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव १७ फेब्रुवारीच्या महासभेत आला. परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकाकडून होत असल्याने, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर महापालिकेतील कलानी समर्थकांची सत्ता उलथून टाकणाऱ्या शिवसेना- भाजपने धुमधडाक्यात महापालिका परिवहन बससेवा खाजगी ठेकेदारा मार्फत जानेवारी २०१० साली सुरू केली. तर सन २००७ साली परिवहन समितीची स्थापना करण्यात आली होती.
परिवहन बस सेवेचे नागरिकांनी जोशात स्वागत केले असून अल्प दरात शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाता येत होते. तसेच अंबरनाथ, बदलापूर, कल्याण शहारा पर्यंत बस सेवेचा विस्तार झाला होता. महापालिकेने ठेकेदारांच्या मागणी नुसार तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग, बस थांब्याकरीता भाडेतत्वावर विठ्ठलवाडी अम्ब्रॉसिया हॉटेल जवळील आरक्षण क्रं-१९३ व कैलास कॉलनी येथील आरक्षण क्रं-५० चे भूखंड ठेकेदाराला देण्यात आले होते.
महापालिका परिवहन बसेस चांगल्या प्रकारे सुरू असताना, बस तिकीट दरवाढीच्या मागणी वरून महापालिका व ठेकेदार आमनेसामने आले. तिकीट दरवाढ दिली जात नसल्याने, ठेकेदाराने टप्याटप्याने परिवहन बस सेवा बंद करण्यास सुरुवात केली. जुलै २०१४ मध्ये अवघ्या साडे ४ वर्षात सुरू झालेली परिवहन बस सेवा ठप्प झाली.
नागरिक व राजकीय पक्षाच्या मागणीनुसार परिवहन बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. मात्र महापालिकेच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान पूर्वी प्रमाणे राज्य महामंडळाच्या बसेस शहरातून सुरू करा. अशी विनंती करण्याची नामुष्की महापालिकेवर आली. एकीकडे परिवहन बस सेवा बंद असताना, दुसरीकडे परिवहन समितीवर लाखो रुपयांचा खर्च सुरू होता. तो खर्च टाळण्यासाठी परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून महासभेत आणण्यात आल्याचे बोलले जाते.
परिवहन बस सेवा हवी, सत्ताधाऱ्यांचे अपयश
महापालिका परिवहन बस सेवा शिवसेनेच्या सत्ताकाळात धुमधडाक्यात सुरू झाली होती. त्यांच्याच सत्ताकाळात परिवहन समिती बरखास्त करण्याची वेळ आल्याची टीका होत आहे. चार वर्षात परिवहन बस सेवेचे स्वप्न सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या दुर्लक्षामुळे आल्याचीही टीका होत आहे.