अखेर उल्हासनगर महापालिका परिवहन ई-बस व सिंधूभवनचे रविवारी लोकार्पण
By सदानंद नाईक | Published: March 9, 2024 08:19 PM2024-03-09T20:19:21+5:302024-03-09T20:21:16+5:30
लोकसभा निवडणूका आचारसंहिता केंव्हाही लागणार असल्याने, अखेर लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांशिवाय उरकला.
उल्हासनगर: महापालिका परिवहन ई-बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रविवारी दुपारी शहाड बस डेपो येथे होणार आहे. लोकसभा निवडणूका आचारसंहिता केंव्हाही लागणार असल्याने, लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांशिवाय उरकला.
उल्हासनगर परिवहन ई-बससेवा सज्ज असून बससेवा लोकार्पण सोहळ्याच्या प्रतिक्षेत होती. अखेर रविवारी दुपारी २ वाजता शहाड डेपो येथे महापालिका परिवहन ई-बस सेवा तसेच सिंधुभवन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. गुरवारी महापालिका परिवहन बसच्या तिकिटाचे भाडे निश्चित करण्यात आले असून २ किमी अंतरापर्यंत वातानुकूलित बसची तिकीट १० रुपये तर ४ किमी पर्यंत १५ रुपये, ६ किमी पर्यंत १८ रुपये तर ८ किमी अंतरापर्यंत २५ रुपये राहणार आहेत. तर विना वातानुकूलित बसचे तिकीट दर २ किमी अंतरापर्यंत ५ रुपये, ४ किमी पर्यंत १० रुपये, ६ किमी पर्यंत १२ रुपये तर ८ किमी पर्यंत १८ रुपये असणार आहे. त्यांनतर प्रत्येक २ किमी अंतरावर २ ते ३ रुपये तिकिटाचे दर वाढणार आहे. तर मुलांना निश्चित तिकीटच्या अर्धी तिकीट राहणार आहे.
महापालिका परिवहन बससेवा रविवार पासून रस्त्यावरून धावणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापालिका बस डेपो, चार्जिंग स्टेशन, चालक व वाहक सज्ज आहेत. केंद्राने चार्जिंग स्टेशनसाठी ५ कोटीचा निधी दिला आहे. तर केंद्राकडून बस डेपोसाठी १५ कोटी ३० लाख व डेपोच्या नदी किनारी संरक्षण भिंत बांधण्यात साठी ३ कोटी मंजूर झाला. तसेच केंद्राकडून १०० बसेस महापालिकेला लोकसभा निवडणुकीनंतर मिळणार आहे. महापालिका परिवहन बस सेवेमुळे कमीतकमी १ हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही बोलले जाते.
रविवारी महापालिका परिवहन बस रस्त्यावर धावणार
महापालिकेने खाजगी ठेकेदाराद्वारे सुरू केलेली परिवहन बस सेवा गेल्या ७ वर्षांपूर्वी बंद पडली होती. अखेर महापालिकेने खरेदी केलेल्या एसी-नॉनएसी बस रविवार पासून लोकार्पणनंतर रस्त्यावर धावणार असून नागरिकां मध्ये आनंदाचे वातावरण आहे.