उल्हासनगर महापालिका स्वर्गरथाची गाडी रस्त्याच्या डिव्हायडर्समध्ये फसली
By सदानंद नाईक | Updated: June 22, 2024 17:38 IST2024-06-22T17:38:22+5:302024-06-22T17:38:35+5:30
नशेखोर गाडी चालकांवर कारवाईची मागणी

उल्हासनगर महापालिका स्वर्गरथाची गाडी रस्त्याच्या डिव्हायडर्समध्ये फसली
उल्हासनगर : रस्त्याच्या दुरावस्थामुळे अग्निशमन दलाची गाडी खड्डयात फसल्याच्या घटनेनंतर, महापालिका स्वर्गरथ गाडी रस्त्याच्या डिव्हायडर्समध्ये अडकल्याची घटना गुरवारी दुपारी घडली. मात्र स्वर्गरथ गाडी चालक दारूच्या नशेत असल्याचे प्रथमदर्शनी उघड झाल्याने, कारवाईची मागणी होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, मधील आशेळेगाव मैदानाकडे जाणाऱ्या काँक्रीट रस्त्याच काम सुरू असून रस्त्याचे काम अर्धवट आहे. गुरुवारी दुपारी या रस्त्याने महापालिकेची स्वर्गरथ गाडी (शव वाहिनी) जात होता. यावेळी नशेखोर चालकामुळे स्वर्गरथ रस्त्याच्या डिव्हायडर्स मध्ये फसल्या गेली. याप्रकाराने शहरातील रस्त्याची दुरावस्था उघड झाली असून महापालिका स्वर्गरथावरील नशेखोर चालकाचा प्रताप उघड झाला. स्वर्गरथ मध्ये मृतदेह असतातर, काय परिस्थिती निर्माण झाली असती? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
महापालिका स्वर्गरथ चालक दारूच्या नशेत असल्याने, त्याचे नियंत्रण सुटून स्वर्गरथ रस्त्याच्या डिव्हायडर्स मध्ये फसल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले. याप्रकारची महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी गांभीर्याने दखल घेतली. आयुक्तांच्या आदेशान्वये वाहन विभागाने, केशव नावाच्या वाहन चालकाला कारणे दाखवा नोटीस बजाविल्याने, त्याच्यावरकारवाईची टांगती तलवार लटकली आहे. एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून पुनर्बांधणीसाठी रस्ते खोदले आहे. या खोदलेल्या रस्त्यात वाहने फसत असल्याच्या घटना घडत असून महापालिकेच्या भोंगळ कारभारावर सर्वस्तरातून टीका होत आहे.