उल्हासनगर पालिका : महापौरपदाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 03:19 AM2018-07-13T03:19:01+5:302018-07-13T03:19:14+5:30
पावसाळी अधिवेशनंतर महापौरपदाचा निर्णय घेण्याचे संकेत एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दबावतंत्राचा वापर करत साई पक्षासह रिपाइं व राष्ट्रवादी पक्ष सोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महापौरपदाचा प्रश्न लटकणार असे बोलले जात आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : पावसाळी अधिवेशनंतर महापौरपदाचा निर्णय घेण्याचे संकेत एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दबावतंत्राचा वापर करत साई पक्षासह रिपाइं व राष्ट्रवादी पक्ष सोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महापौरपदाचा प्रश्न लटकणार असे बोलले जात आहे.
मीना आयलानी यांच्या महापौरपदाला पाच जुलैला सव्वावर्ष होताच ओमी टीमने भाजपातील निष्ठांवत गटाला सोबत घेवून गेल्या आठवडयात नागपूर गाठले. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेवून महापौरपदाची आठवण करून दिली. पावसाळी अधिवेशनानंतर दिलेला शब्द पूर्ण करणार अशी ग्वाही या निष्ठावंत गटाला दिल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला आमदार ज्योती कलानी, नरेंद्र पवार, सभागृहनेते जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी यांच्यासह ओमी टीमचे विश्वासू राजेश वधारिया आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुरस्वानी यांनी पत्रकार परिषद घेत मीना आयलानी मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार जुलैच्या अखेर महापौरपदाचा राजीनामा देणार असे जाहीर करून टाकले. त्याचवेळी आयलानी, महापौरांनी राजीनामा देण्याबाबत मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिले नसल्याचे सांगितले. यामुळे भाजपातील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला आहे. मूळात आयलानी यांची कलानी यांना सत्तेत घेऊ नये अशीच पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. सभागृह नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत मला ठाऊक नसल्याचे सांगत आयलानी यांनी निष्ठावंत गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. यातून पक्षात आलबेल नाही हे सिद्ध झाले.
ओमी विरोधकांची मोट बांधणार
शहर विकासाबाबत कुमार आयलानी, महापौर आयलानी यांनी ओमी टीम व भाजपातील निष्ठावंत गटाला डावलून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत उपमहापौर जीवन इदनानी, रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री सोबत होते. पालिकेत साई पक्षाचे १२, रिपाइं गटाचे ३ व राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहेत. आयलानी, इदनानी, भालेराव व गंगोत्री ओमी कलानी टीमचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.
विकासकामांबाबत महासभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी शहर विकासासाठी ३५० कोटीचा निधी देण्याचे संकेत दिले होते. या निधीतून शहरातील रस्ते, पाणी टंचाई, वृक्षारोपण आदी कामे होणार आहेत. याबाबत १८ व २० जुलैला महासभा व विशेष महासभा होणार असून यासंदर्भात गुरूवारी महापौरांच्या दालनात बैठक झाली.
ओमी टीमला पदापासून ठेवले दूर
उल्हासनगर पालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर येथील पदे भाजपाने स्वत:कडे तसेच साई पक्षाकडे ठेवली. सत्तेत सहभागी असूनही ओमी टीमला पदापासून कायम दूर ठेवले. अगदी प्रभाग समिती सदस्य, सभापतीपदही टीमला मिळणार नाही याची पुरेपूर काळजी भाजपाने घेतली होती. त्यामुळे एकेकाळी कलानी यांचे वर्चस्व असलेल्या पालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपाला यश आले.