उल्हासनगरात भाजपा गॅसवर : ‘साई’च्या फुटीर गटाला सेनेची महापौरपदाची आॅफर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 02:57 AM2018-09-23T02:57:21+5:302018-09-23T02:57:46+5:30

साई पक्षाच्या फुटीर गटाला शिवसेनेने महापौरपदासह स्थायी समिती सभापतीपदाची आॅफर दिल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे.

Ulhasnagar political news | उल्हासनगरात भाजपा गॅसवर : ‘साई’च्या फुटीर गटाला सेनेची महापौरपदाची आॅफर

उल्हासनगरात भाजपा गॅसवर : ‘साई’च्या फुटीर गटाला सेनेची महापौरपदाची आॅफर

Next

- सदानंद नाईक
उल्हासनगर  - साई पक्षाच्या फुटीर गटाला शिवसेनेने महापौरपदासह स्थायी समिती सभापतीपदाची आॅफर दिल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे. साईच्या फुटीर नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे वेगळ्या गटासाठी अर्ज दाखल केला असून सोमवारी महापौरपदाकरिता अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने त्याच दिवशी सर्व राजकीय चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.
शहर विकासाचे स्वप्न बघून साई पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, दीड वर्षात शहराचा विकास होण्याऐवजी शहर भकास झाल्याची टीका साई पक्षातील फुटीर गटाचे नगरसेवक टोणी सिरवानी यांनी ‘लोकमत’कडे केली.
सिंधी समाज दररोज शहरातून स्थलांतरित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी ३०० कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली. मात्र, एकही काम सुरू झाले नाही. शहर विकास आराखडा, कल्याण-अंबरनाथ रस्त्याची पुनर्बांधणी, पाणीटंचाई, ठप्प पडलेल्या विकास योजना, पालिकेला सक्षम आयुक्तासह इतर अधिकारी न देणे आदी अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. शहराचे हित लक्षात घेऊन दोन दिवसांत निर्णय घेणार असून शिवसेनेने महापौरपदाची आॅफर दिली असल्याची कबुली सिरवानी यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी भाजपाने ओमी कलानी टीमसोबत आघाडी केली. मात्र, बहुमताएवढे त्यांचे नगरसेवक निवडून न आल्याने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांना मुख्यमंत्र्यांची थेट भेट घालून देऊन त्यांचा पाठिंबा मिळवला. भाजपा-ओमी टीमचे ३२, तर साई पक्षाचे १२ असे एकूण ४४ नगरसेवक भाजपा आघाडीकडे आहेत. बहुमतासाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. २५ नगरसेवक असलेल्या शिवसेनेने गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी ‘साई’तील शेरी लुंड गटाला महापौरपदाची आॅफर देऊन गळ टाकला होता. मात्र, ऐनवेळी चव्हाण यांनी बंडखोर नगरसेवकांच्या घरात ठाण मांडले. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची करत उल्हासनगरात पाय रोवल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता.
मीना आयलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्याने २८ सप्टेंबरला महापौरपदाची निवडणूक होत आहे. सोमवारी महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यापूर्वीच साई पक्षातील सात नगरसेवक अज्ञातस्थळी गेले असून त्यांनी वेगळ्या गटासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला आहे. या फाटाफुटीमुळे भाजपाच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.

डावपेचात यशस्वी होणार कोण? शिंदे की चव्हाण?

साईच्या फुटीर गटाला शिवसेनेने महापौर व स्थायी सभापतीपदाची आॅफर दिल्याची चर्चा आहे. सेनेला आपली सत्ता स्थापन करण्यापेक्षा भाजपाची सत्ता घालवण्यात अधिक रस आहे. या डावपेचात शिंदे यशस्वी होतात की चव्हाण, याचे कुतूहल वाढले आहे.

साई पक्षातील फुटीर गटाने महापौरपदासाठी अर्ज भरल्यास भाजपाला मोठा धक्का बसेल. अर्थात, त्यांच्याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असल्याने साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून ते ‘साई’तील फुटीर गटाला माघार घेण्यास भाग पाडू शकतात.

चव्हाण यांनी शनिवारी भाजपा नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी ‘साई’तील भाजपासोबत असलेल्या चार नगरसेवकांना बोलावले होते. मात्र, ते फिरकले नाहीत. शहरात भाजपा, शिवसेनेऐवजी छोट्या पक्षांचे नेते खेळवत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Ulhasnagar political news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.