उल्हासनगरचे खड्डे १३ कोटींवर!, १३५ टक्के वाढीव दराची निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:01 AM2017-08-29T02:01:15+5:302017-08-29T02:01:53+5:30
उल्हासनगरचे खड्डे भरण्याचा ठेका परस्पर आधीच्याच ठेकेदाराला देण्यास विरोध झाल्यानंतर त्या कामाची निविदा काढली आणि आधी साडेचार कोटींत होणारे काम आता १३ कोटींवर गेले आहे.
उल्हासनगर : उल्हासनगरचे खड्डे भरण्याचा ठेका परस्पर आधीच्याच ठेकेदाराला देण्यास विरोध झाल्यानंतर त्या कामाची निविदा काढली आणि आधी साडेचार कोटींत होणारे काम आता १३ कोटींवर गेले आहे. या कामाची निविदा १३५ टक्के वाढीव दराने आल्याने स्थायी समितीत जोरदार टीका झाली. सभापती कांचन लुंड यांच्यासह आयुक्त निंबाळकर व विविध पक्षांच्या नेत्यांनी या निविदेला विरोध केला आहे. दरम्यान, महापौर मीना आयलानी, आ. बालाजी किणीकर यांच्यामुळे खड्ड्यांच्या दुरूल्तीचा खर्च वाढल्याचा आरोप करत ते खलनायक ठरल्याचा ठपका युवा नेता संतोष पांडे यांनी ठेवला.
उल्हासनगरची रस्ता दुरूस्ती आणि खड्डे भरण्याचे काम गणेशोत्सव, चालिया उत्सव आणि नवरात्रोत्सवापूर्वी व्हावे, अशी मागणी सर्व पक्षांकडून झाल्याने स्थायीने अत्यावश्यक कामाच्या नावाखाली साडेचार कोटीचा ठेका देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तो दोन ठेकेदारांना विभागून दिला. त्याला सोशल मीडियावर विरोध झाला. महापौर मीना आयलानी व आ. बालाजी किणीकर यांनीही निविदा न काढता साडेचार कोटीचा ठेका अत्यावश्यक कामाअंतर्गत देण्याला विरोध केला. अखेर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी ठेका रद्द करून फेरनिविदा काढण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले.
रस्ता दुरस्ती व खड्डे भरण्याच्या निविदेत आणखी काही रस्त्याचा समावेश करून पाच कोटी ६५ लाखांची फेरनिविदा काढण्यात आली. त्याला १३५ टक्के वाढीव दराने प्रतिसाद मिळाला आणि निविदा थेट १३ कोटी ५० लाखांवर गेली. तिला महापौर मीना आयलानी, आ. बालाजी किणीकर, उपमहापौर राजू इदनानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, विरोधी पक्षनेता रमेश चव्हाण यांनी विरोध करत ठेकेदाराच्या मनमानीपणावर टीका केली. आयुक्तांनीही नाराजी व्यक्त करून चौकशीचे आश्वासन दिले. मात्र गणेश उत्सवादरम्यान २४ लाखाच्या निधीतून तात्पुरते खड्डे भरण्यास अत्यावश्यक कामाखाली परवानगी दिली.
महापौर मीना आयलानी व आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधामुळेच साडेचार कोटींचा रस्ता दुरस्ती व खड्डे भरण्याचा ठेका १३ कोटी ५० लाखांवर गेल्याचा आरोप युवा नेता संतोश पांडे यांनी केला. त्यांनी कामाला विरोध केला नसता, तर रस्ते चकाचक असते. तसेच बाप्पाचे आगमन व निरोप चांगल्या रस्त्यातून झाले असते, असा दावा त्यांनी केला.