उल्हासनगर स्वच्छ सर्वेक्षणात देशात ११० वा तर राज्यात २१ व्या स्थानी
By सदानंद नाईक | Updated: January 11, 2024 19:06 IST2024-01-11T19:05:30+5:302024-01-11T19:06:28+5:30
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी आरोग्य विभाग व सफाई कामगारांचे कौतुक केले आहे.

उल्हासनगर स्वच्छ सर्वेक्षणात देशात ११० वा तर राज्यात २१ व्या स्थानी
उल्हासनगर: केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभिमान २०२३ मध्ये महापालिका देशात ४४६ पैकी ११० व्या स्थानी तर राज्यातील ४४ शहरा पैकी २१ वे स्थान पटकावले आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी आरोग्य विभाग व सफाई कामगारांचे कौतुक केले आहे.
उल्हासनगर शहर केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभिमान सन-२०२२ मध्ये उल्हासनगर महापालिका देशात १५१ व्या तर राज्यात ३० वी आली होती. तर गेल्या आठवड्यात विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक अस्वच्छ शहर म्हणून टिपण्णी केली होती. मात्र यावर्षी महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव आदींनी स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना यशस्वीपणे राबविली. त्या अभियानाला यश आले असून देशात उल्हासनगर ११० व्या स्थानी तर राज्यात २१ व्या स्थानी आले आहे.
महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, स्वछता निरीक्षक, महापालिका सफाई कामगार, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आदींनी स्वच्छता विशेष मोहीमेत भाग घेऊन मोहीम यशस्वी केली. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, कचरा वेचण्याचे ठिकाण विकसित करणे, स्वच्छतेबाबत रहिवाशांमध्ये जनजागृती करणे, शहराला कचरा कुंड्या मुक्तीकडे नेने आदी पद्धती राबवल्या आहेत. त्यामुळेच महापालिका स्वच्छता सर्वेक्षणात राज्यात ४४ शहरातून २१ वे स्थान पटकावल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. याचे श्रेय त्यांनी आरोग्य विभाग व सफाई कामगारांनी दिलीं आहे.