उल्हासनगर दिवाळीत राहिले कचरा मुक्त; महापालिकेची स्वच्छता मोहीम यशस्वी
By सदानंद नाईक | Published: October 29, 2022 04:33 PM2022-10-29T16:33:24+5:302022-10-29T16:33:42+5:30
शहरातील गजानन व जपानी मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध असून दिवाळीत येथे गर्दीचा उच्चांक यावर्षी होता. त्याच प्रमाणे इलेक्ट्रॉनिक मार्केट, फर्निचर मार्केट, गाऊन मार्केट, बॅग मार्केट, जीन्स मार्केट मध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
उल्हासनगर : दिवाळी सणा दरम्यान शहर कचरा मुक्त राहण्यासाठी महापालिकेने स्वच्छता मोहीम राबविली. सुट्टीच्या दिवशी व रात्री कचरा उचलण्याचे काम महापालिका कर्मचाऱ्यांनी केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
उल्हासनगरवासीयांची दिवाळी स्वच्छ व सुंदर जाण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी कचरा साफसफाई करण्याचे काम केले. तर कचरा उचळणाऱ्या कोणार्क कंपनीने जादा जेसीबी मशीन, डंपर महापालिकेला उपलब्ध करून दिले. सफाई कर्मचाऱ्यातील किमान ३० टक्के कर्मचाऱ्यांना रविवारच्या दिवशी बोलवून मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा स्वच्छ करून, त्या बदल्यात त्यांना इतर दिवशी सुट्टी देण्यात आली. जनहितासाठी कर्मचारी संघटनांनी देखील याबाबत प्रशासनाला सहकार्य केल्याचे लेंगरेकर म्हणाले.
शहरातील गजानन व जपानी मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध असून दिवाळीत येथे गर्दीचा उच्चांक यावर्षी होता. त्याच प्रमाणे इलेक्ट्रॉनिक मार्केट, फर्निचर मार्केट, गाऊन मार्केट, बॅग मार्केट, जीन्स मार्केट मध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, कचरा संकलन करण्यासाठी नियमित घंटागाड्यांबरोबरच अतिरिक्त कर्मचाऱ्याची व्यवस्था करून दिवस व रात्र स्वच्छता मोहीम राबविली. आयुक्त अजिज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, आरोग्य विभाग प्रमुख मनिष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे व एकनाथ पवार यांनी शहरात फिरून स्वच्छतेचा आढावा घेतला. त्यामुळेच शहरवासीयांचे दिवाळी कचरा मुक्त गेली.