उल्हासनगरवासियांचा जीव गुदमरतोय, डम्पिंग ग्राऊंडला आग, हवेमुळे सर्वत्र धूरच धूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 06:01 PM2022-03-24T18:01:15+5:302022-03-24T18:01:49+5:30
उल्हासनगर पूर्वेतील गायकवाड पाडा परिसरात खडी खदान येथे महापालिकेचे डम्पिंग ग्राऊंड असून त्याची क्षमता केंव्हाच संपली आहे. डम्पिंग ग्राऊंडवर प्लास्टिक व कपडा चिंध्यांच्या कचऱ्यात वाढ झाल्याने, डम्पिंगला वारंवार आग लागल्याचा घटना होत आहे.
सदानंद नाईक -
उल्हासनगर- महापालिकेच्या खडी खदान डम्पिंग ग्राऊंडला आग लागून परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून ३५ हजार पेक्षा जास्त नागरिकांच्या आरोग्याचला धोका निर्माण झाला आहे. महापालिका आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व नगरसेवक भारत गंगोत्री यांनी केला आहे.
उल्हासनगर पूर्वेतील गायकवाड पाडा परिसरात खडी खदान येथे महापालिकेचे डम्पिंग ग्राऊंड असून त्याची क्षमता केंव्हाच संपली आहे. डम्पिंग ग्राऊंडवर प्लास्टिक व कपडा चिंध्यांच्या कचऱ्यात वाढ झाल्याने, डम्पिंगला वारंवार आग लागल्याचा घटना होत आहे. त्यामुळे डम्पिंग परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले असून पालिका आग विझविण्यासाठी काही एक ठोस कारवाई करीत नसल्याचे उघड झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून जोरदार वारे वाहत असल्याने, डम्पिंग वरील धूर २ ते ३ की.मी. परिसरातील ३५ ते ४० हजार नागरी वस्तीत पसरला आहे. अनेकांना श्वसनाचा त्रास होत असून दमा, क्षयरोग, त्वचा रोग नागरिकांना होत आहे. धुरामुळे शेकडो नागरिकांनी येथून स्थलांतर केल्याची माहिती स्थानिक नागरिक देत आहेत.
महापालिकेने नागरी वस्तीच्या मधोमध असलेले डम्पिंग इतरत्र हलविण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेने डम्पिंग साठी राज्य शासनाकडे पर्यायी जागेची मागणी केली आहे. शासनाने शहरा शेजारील हाजी मलंग परिसरातील उसाटणे गाव हद्दीत जागा दिली. मात्र जागेचा विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेताच, स्थानिक नागरिकांनी डम्पिंगला विरोध केला. भाजप आमदार गणपत गायकवाड व कुमार आयलानी यांनी डम्पिंगला विरोध केला. पालिकेचे आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी उसाटने गाव हद्दीतील डम्पिंग ग्राऊंडची पाहणी केली. मात्र डम्पिंगचा प्रश्न सुटता सुटत नसल्याचा प्रत्यय येत आहे. गेल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व उपयुक्त सुभाष नाईकवाडे यांनी डम्पिंग जागेची पाहणी केली. मात्र स्थानिक नागरिकांचा विरोध कायम आहे.
उसाटने डम्पिंगचा प्रश्न मिटवू - उपायुक्त जाधव
शहरात डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून उसाटने गाव हद्दीतील डम्पिंग प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा मानस उपायुक्त सुभाष जाधव यांनी व्यक्त केला. काही महिन्यात डम्पिंगचा प्रश्न सुटलेला असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.