उल्हासनगर-शहाड रस्ता सहा महिने अर्धवटच!
By admin | Published: March 21, 2016 01:22 AM2016-03-21T01:22:25+5:302016-03-21T01:22:25+5:30
शहाड ते पालिकादरम्यानच्या रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांनी संबंधित कंत्राटदाराला आठवडाभराचा अल्टीमेटम तसेच पालिका अधिकाऱ्यांवरही
उल्हासनगर : शहाड ते पालिकादरम्यानच्या रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांनी संबंधित कंत्राटदाराला आठवडाभराचा अल्टीमेटम तसेच पालिका अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, रस्त्याच्या अर्धवट कामामुळे मागील चार महिन्यांत सहा जणांचे बळी गेले आहेत.
या रस्त्याच्या कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय रिजवान, उपअभियंता जितू चोयथानी, संदीप जाधव यांच्यावर आयुक्तांनी ठपका ठेवला आहे. उल्हासनगर महापालिका ते शहाड रेल्वे स्थानकादरम्यानचा रस्ता भूमिपूजनापासूनच वादात सापडला आहे.
रस्त्याचे एकदा नव्हे तर दोनदा राजकीय श्रेय घेण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीकडून भूमिपूजन झाले. मात्र, रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून अर्धवटच आहे. यामुळे चार महिन्यांत सहा जणांचे बळी गेले, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांनी केला आहे.
मृत नातेवाइकांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याची मागणी महासभेने केली आहे. तसेच कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते मनोज लासी यांनी केली आहे.
या रस्त्यासाठी सरकारने १७ कोटी दिले आहेत. या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करत काळ्या यादीत टाकण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते नाना बागुल यांनी कंत्राटदारासह पालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंत्राटदाराच्या रकमेतून मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. रस्त्याचे प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात आल्यावर आयुक्त मनोहर हिरे यांनी हस्तक्षेप करत कंत्राटदाराला काम करण्याचा दम दिला आहे. (प्रतिनिधी)