उल्हासनगरच्या भरवस्तीत शिरला बिबट्या, वन विभागाने सहा तासांनंतर केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:06 AM2018-03-19T05:06:50+5:302018-03-19T05:06:50+5:30
कॅम्प नं-५, भाटिया चौकातील एका बंगल्यात रविवारी सकाळी ८ वाजता बिबट्या शिरल्याची माहिती पसरताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री यांनी बिबट्या आल्याची माहिती हिललाइन पोलिसांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उल्हासनगर : कॅम्प नं-५, भाटिया चौकातील एका बंगल्यात रविवारी सकाळी ८ वाजता बिबट्या शिरल्याची माहिती पसरताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री यांनी बिबट्या आल्याची माहिती हिललाइन पोलिसांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणे वन विभागाच्या शीघ्र कृती दलाच्या जवानांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन तब्बल ६ तासांनी बिबट्याला जेरबंद केले.
उल्हासनगर कॅम्प नं-५ भाटिया चौकातील भरवस्तीच्या ठिकाणी बिबट्या आल्याची माहिती गंगोत्री व माधव बगाडे यांना नागरिकांनी दिली. त्यांनाही बिबट्या आला यावर विश्वास बसला नाही. त्यांनी काही इमारतींचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची शहानिशा केली असता बिबट्या अनेक इमारतीच्या आवारातून जाऊन एका बंगल्यात घुसला असल्याचे दिसला. गंगोत्री यांनी त्वरित हिललाइन पोलीस ठाण्याला माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बंगल्यातील नागरिकांना गंगोत्री यांनी सहकाºयांच्या मदतीने बाहेर काढले. सकाळी ९ नंतर परिसरात बिबट्याला पाहण्यासाठी आलेल्या बघ्यांमुळे जत्रेचे स्वरूप आले होते.
बिबट्या ज्या बंगल्यात शिरला होता तेथील गेट पोलिसांनी बाहेरून बंद करून नागरिकांना येण्याजाण्याचा मार्ग बंद केला. दुपारी १ नंतर ठाणे वन विभागाचे शीघ्र कृती दलाचे जवान आल्यावर पथकाच्या जवानांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यापूर्वी बंगल्याच्या आत मातीच्या जागी बिबट्याचे ठसे त्यांना मिळाले होते.
बिबट्या आत असल्याची खात्री झाल्यावर मागील भिंतीला भगदाड पाडून बिबट्याला बेशुद्ध करणारे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्याला बाहेर काढून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. सहा तासांनंतर बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
>बिबट्या भरवस्तीत आलाच कसा?
उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर आहे. १३ किलोमीटर क्षेत्रफळात तब्बल ९ ते १० लाख लोकसंख्या असून मोकळे भूखंड अत्यंत कमी आहे. अशा दाटवस्तीच्या ठिकाणी बिबट्या आलाच कसा? असा प्रश्न सामान्य नागरिकांसह पोलीस व वन विभागाला पडला आहे. बिबट्या ज्या बंगल्यात घुसला होता त्याच विभागात म्हशींचा गोठा आहे. म्हशींसाठी सकाळी जंगलातून गवत आणले जाते. गवताच्या ट्रकमध्ये बिबट्या आला असावा असा अंदाज बांधला जात आहे.