उल्हासनगरचे शिवसेना नगरसेवक मातोश्रीवर, शिंदे समर्थकांच्या बैठकीलाही उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 10:29 PM2022-07-09T22:29:24+5:302022-07-09T22:30:06+5:30
उल्हासनगरातील बहुतांश शिवसैनिक, पदाधिकरी, नगरसेवकांनी शनिवारी दुपारी मातोश्री गाठून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले.
उल्हासनगर : शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, रमेश चव्हाण यांच्यासह कट्टर शिवसैनिक व पदाधिकारी यांनी रविवारी मातोश्री गाठून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर दुसरीकडे शिंदे समर्थक नगरसेवक अरुण अशान यांनी गोलमैदान येथील खासदार शिंदे यांच्या कार्यालयात समर्थकांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
उल्हासनगरातील बहुतांश शिवसैनिक, पदाधिकरी, नगरसेवकांनी शनिवारी दुपारी मातोश्री गाठून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले. उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पक्ष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितीना मार्गदर्शन केले. अशी माहिती शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. पक्षातील बहुतांश नगरसेवक व पदाधिकारी हें पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे चौधरी म्हणाले. जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांच्यासह शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, रमेश चव्हाण, राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड यांच्यासह नगरसेवकांनी महापालिकेवर पुन्हा भगवा झेंडा फडकणार असल्याचे संकेत दिले.
शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौशरी यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी मातोश्रीवर जाऊन शक्तिप्रदर्शन केले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नगरसेवक अरुण अशान, नगरसेवक व माजी महापौर लिलाबाई अशान, कुलवंत सिंग बिटो, शुभांगी बेहेनवाल, नाना बागुल, अंकुश म्हस्के आदींनी गोलमैदान येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठकीचा सपाट लावला. शिवसेना पक्षातील समर्थक नगरसेवक व इतर पक्षातील नगरसेवक व पदाधिकारी शिवसैनिकेत दाखल होण्याचे संकेत अरुण अशान यांनी दिले. आमच्याकडे एकून १२ नगरसेवक असल्याचा दावाही अशान यांनी करून त्यांच्यात वाढ होत असल्याची माहिती दिली.
शिंदे गटाकडे मूळ शिवसैनिक नाहीत
अरुण अशान यांनी एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेतील व इतर पक्षातील नगरसेवकासह पदाधिकारी वळविण्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र शिंदे गटाकडे जे १२ नगरसेवक असल्याचा दावा केला जातो. त्यातील बहुतांश जण दुसऱ्या पक्षातून आले असून ते उपरे असल्याची टीकाही त्यांनी केली.