उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुखाच्या निवडीला मुहूर्त लागेना? अनेकांची नावे चर्चेत
By सदानंद नाईक | Published: October 9, 2024 05:52 PM2024-10-09T17:52:00+5:302024-10-09T17:52:25+5:30
Ulhasnagar News: उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुखासह कार्यकारणी बरखास्तीला तीन महिनें उलटूनही नवीन शहरप्रमुखाच्या निवडीला मुहूर्त लागत नसल्याने शिंदेंसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मात्र पुढील आठवड्यात शहरप्रमुखासह कार्यकारणी घोषित करण्याचे संकेत दिले आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुखासह कार्यकारणी बरखास्तीला तीन महिनें उलटूनही नवीन शहरप्रमुखाच्या निवडीला मुहूर्त लागत नसल्याने शिंदेंसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मात्र पुढील आठवड्यात शहरप्रमुखासह कार्यकारणी घोषित करण्याचे संकेत दिले आहे.
उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना पदाधिकाऱ्यात बदल व चैतन्य निर्माण करण्यासाठी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहराच्या शहरप्रमुखासह कार्यकारणी गेल्या तीन महिन्यांपूर्वी बरखास्त केल्या आहेत. नव्या शहरप्रमुख व कार्यकारणीसाठी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार श्रीकांत शिंदे आदींच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहे. मात्र गेल्या तीन महिन्यापासून दोन्ही शहराचे शहरप्रमुख व कार्यकारणी निवड घोषित केली नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या असून शहराची भागदौड सोपविण्यासाठी शहरप्रमुख व कार्यकारणी निवड करण्याची मागणी दबक्या आवाजात पक्षातून होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना याबाबत विचारले असता, पुढील आठवड्यात दोन्ही शहराचे शहरप्रमुख व कार्यकारणी तसेच महिला आघाडी प्रमुख व कार्यकारणी घोषित करण्याचे संकेत दिले.
उल्हासनगर शहरप्रमुख पदासाठी राजेंद्र चौधरी, नाना बागुल, रमेश चव्हाण, राजेंद्रसिंग भुल्लर, बाळा श्रीखंडे, संदीप गायकवाड, दिलीप गायकवाड, स्वप्नील बागुल आदींच्या नावाची चर्चा होत आहे. राजेंद्र चौधरी यांनी पक्षाकडे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली असून त्यांची कल्याण जिल्हाप्रमुख पदी निवड होण्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुखांची जबाबदारीही राजेंद्र चौधरी यांच्याकडे आहे. महिला आघाडी प्रमुख पदासाठीही असंख्य महिला पदाधिकार्यांची नावे चर्चेत असून नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. शहरप्रमुख पदाची माळ आपल्याच गळ्यात पडण्यासाठी अनेक इच्छुकांनी वरिष्ठ नेत्याकडे मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चाही शहरात रंगली आहे.