उल्हासनगर गोळीबार प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 09:44 PM2020-10-30T21:44:54+5:302020-10-30T21:48:18+5:30
बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करणाऱ्या टोळीतील शाहरुख सय्यद (२२) या आणखी एका आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने उल्हासनगरमधून अटक केली आहे. यापूर्वी याच प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करणाºया टोळीतील शाहरुख सय्यद (२२, रा. इंदिरानगर, कल्याण) या आणखी एका आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने उल्हासनगरमधून अटक केली आहे. त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
बांधकाम व्यावसायिक गायकवाड यांच्यावर गोळीबार करीत डोक्यावर हल्ला करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाºया हितेश ठाकूर (२३) आणि सागर शिंदे (२३) या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने यापूर्वीच नाशिक येथून २३ आॅक्टोबर रोजी अटक केली होती. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची कबूली या दोघांनी पोलिसांना दिली. २२ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर मधील श्रीराम चौकातील एका बार मधून संदीप आणि त्यांचा मित्र जहागीर मोरे हे दोघेही बाहेर पडले. त्याचवेळी एका कारमधून आलेल्या या हितेश याच्यासह दोघांनी गायकवाड यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करीत गावठी रिव्हॉल्व्हरमधून तीन राउंड फायर केले. यात संदीप हा गंभीर जखमी झाला. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने आधी हितेश आणि सागर यांना अटक केली. त्यापाठोपाठ त्यांना हत्यार पुरविणारा त्यांचा तिसरा साथीदार शाहरुख याला २९ आॅक्टोबर रोजी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.