आईच्या वाढदिवशी मुलाने केलं असं काही, माऊलीला आनंदाश्रू आवरताच आले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 10:15 PM2021-08-16T22:15:51+5:302021-08-16T22:17:10+5:30
उल्हासनगरमधील रहिवाशी असलेल्या प्रदीप गरडने त्याच्या आईला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची शहरात मोठी चर्चा आहे. कारण, श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आईचा वाढदिवस साजरा करताना, प्रदीपने चक्क हेलिकॉप्टरमधून आईला फिरवून आणले.
ठाणे - आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकारांच्या नंतर शिकणे अ आ ई... हे गाती आपलं लहानपणीच ऐकलं असेल. आईचा मार म्हणजे फुलाचां हार... हा सुविचारही आपण शाळेत असताना फळ्यावर वाचला असेल. कारण, आई हाच आपला पहिला गुरू असतो, आई हाच आपल्या जगण्याचा मोठा आधार असतो हे अनेक गोष्टींमधून, घटनांमधून, वृत्तांमधून, चित्रपटांमधून आपण पाहिलंय. त्यामुळेच, आपल्या आईला सर्व सुखसोयी देण्याची इच्छा मुलांची असते. ठाण्यातील एका मुलाने आईच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त अशीच आईची इच्छा पूर्णत्वास नेली. प्रदीप गरड असं या मुलाचं नाव असून त्याचं आज सर्वत्र कौतुक होत आहे.
उल्हासनगरमधील रहिवाशी असलेल्या प्रदीप गरडने त्याच्या आईला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची शहरात मोठी चर्चा आहे. कारण, श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आईचा वाढदिवस साजरा करताना, प्रदीपने चक्क हेलिकॉप्टरमधून आईला फिरवून आणले. आपल्या लेकांने दिलेलं हे सरप्राईज पाहून आईचेही डोळे पाणावले. आपल्या लेकांनी आईची केलेली हौस पाहून अनेकांनी प्रदीपचं कौतुक केलंय. तर, प्रदीप म्हणजे आजच्या युगातला श्रावणबाळच असल्याचं आई रेखा यांनी म्हटलंय.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याची लेक असलेल्या रेखा दिलीप गरड लग्नानंतर उल्हासनगरमध्ये स्थायिक झाल्या. मात्र, दुर्दैवाने मुलं शाळेत शिकत असतानाच त्यांचे पती दिलीप गरड यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा सातवीला, मधली मुलगी पाचवीला, तर लहान मुलगा पहिलीत होता. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईनेच कष्टातून मुलांना वाढवलं, शिकवलं. वेळप्रसंगी लोकांच्या घरी धुणीभांडीही केली. प्रदीपला आश्रमशाळेत शिकवलं, त्याच प्रदीपने आईला वाढदिनी हेलिकॉप्टरची सैर घडवली. प्रदीपने आज सकाळी वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं असल्याचं सांगत आईला थेट जुहू एअरबेसला नेलं. तिथं हेलिकॉप्टरमध्ये बसतानाच आईला आनंदाश्रू आवरणे अशक्य झालं.
तेव्हा आईने सहजच म्हटलं होतं.
प्रदीप हा बारावीला असताना अचानक एक दिवस त्यांच्या घरावरुन हेलिकॉप्टर गेलं. यावेळी आपल्याला कधी यात बसायला मिळेल? असं रेखा यांनी सहजच म्हटलं होतं. मात्र, प्रदीपच्या मनात आईचं ते वाक्य घर करुन बसलं. त्यामुळे, आईच्या 50 व्या वाढदिवसाचं निमित्त साधून प्रदीपने आईची ती इच्छा पूर्ण केली. नोकरी करत प्रदीप आज स्वकर्तृत्वाने स्थिरावला आहे. आपल्या आईला चाळीतून फ्लॅटमध्येही घेऊन गेलाय.