उल्हासनगरची विशेष समिती ओमी टीमला की शिवसेनेला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:45 AM2018-04-24T01:45:03+5:302018-04-24T01:45:03+5:30
अंतर्गत वादाचा फटका : २ मे च्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
उल्हासनगर : महापालिका सत्तेतील भाजप-ओमी टिम व साई पक्षातील वादाचा फटका विशेष समिती निवडणुकीलाही बसला आहे. या समिती सदस्यांची निवड २ मेच्या महासभेत होणार असून त्यात भाजपा शिवसेनेला मदत करते की ओमी टीमला एक समिती देऊन पक्षातील नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते, त्यावर सारे राजकीय चित्र अवलंबून आहे.
उल्हासनगर महापालिकेवर सध्या भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता आहे. मात्रअंतर्गत वादामुळे गेल्या महासभेत पाणीटंचाईच्या लक्षवेधीवरून ओमी टीमच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रकरणावरून दोन्ही पक्षातील वाद जास्त ताणले गेले. गेल्या महासभेत १३ विशेष समिती सदस्य निवडण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र सत्ताधारी पक्षातील वाद बघता ऐन वेळी महापौर मीना आयलानी यांनी हा प्रस्ताव पुढे ढकलला. आता २ मे रोजी महासभा बोलाविण्यात आली असून त्यात विशेष समिती सदस्यांची निवड होणार आहे.
महापालिकेत महापौरपद आणि स्थायी समितीचे सभापतीपद भाजपाकडे असून उपमहापौरपद साई पक्षाकडे आहे. चारपैकी दोन प्रभाग समिती सभापतीपदे साई पक्षाकडे, तर एक भाजपाकडे आहे. चौथे सभापतीपद शिवसेनेकडे गेले आहे. भाजपा आणि साई पक्षाने ओमी टीमला पदापासून बाजूला ठेवले असून सत्तेत समान वाटा मिळण्यासाठी नऊ ऐवजी १३ विशेष समित्याची स्थापना केली जाणार आहे. २ मेच्या महासभेत विशेष समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर सभापतीपदाची निवड होणार आहे.
आताच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत विशेष समित्यांत भाजपा ओमी टीमच्या सदस्यांना स्थान देणार की शिवसेनेला खूष करणार हा प्रश्न भाजपापुढे आहे. विशेष समितीपासूनही ओमी टीमला भाजपाने बाजूला ठेवले तर उल्हासनगरातील सत्तांतर अटळ आहे. शिवसेनेला समितीत स्थान देऊन भाजपा नेते त्या पक्षाला सत्तेत वाटा देण्याची सुरूवात या निवडणुकीपासून करेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
जिल्हा नियोजन समिती निवडणुकीवरही नजर
महापालिकेतील एकूण सदस्यसंख्या पाहता जिल्हा नियोजन समितीत तीन सदस्य निवडून जाऊ शकतात. शिवसेनेकडून विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ज्योती गायकवाड; तर भाजपाकडून महेश सुखरामनी व ओमी टीमच्या पंचम कालानी यांनी अर्ज दाखल केले.
११ नगरसेवक असलेल्या साई पक्षाने ज्योती पिंटो भटिजा व गजानन शेळके यांचे अर्ज दाखल केले आहेत. भाजपाने पंचम कलानी यांना पाठिंबा दिला नाही, तर त्यांचा पराभव निश्चित असल्याचे बोलले जाते.