उल्हासनगरमध्ये अजूनही ३५० स्वयंसेवक मानधनाविना; जीव धोक्यात घालून केलं सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 11:46 PM2020-12-03T23:46:33+5:302020-12-03T23:46:57+5:30
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सरकारकडून आलेले मानधन स्वयंसेवकांना मिळाले. मात्र, महापालिकेकडून मिळणारे मानधन अद्याप मिळालेले नाही, अशी तक्रार निकम यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत ३५० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून काम केले. मात्र, महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे मानधन अद्याप दिले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागला असून महापालिकेचा आरोग्य विभाग व महापौर लीलाबाई अशान यांना श्रेय जाते. उपमहापौर भगवान भालेराव, सभागृह नेते भरत गंगोत्री, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, अरुण अशान, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे, डॉ. अनिता सपकाळे आदींच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागात दिलेल्या स्वयंसेवकांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. तसेच संशयित कोरोना रुग्णांची नोंद करून वेळीच उपचार केले. त्यामुळेच कोरोना रुग्णांना ब्रेक लागल्याची प्रतिक्रिया डॉ. सपकाळे यांनी दिली.
शहरात ही मोहीम यशस्वीपणे राबविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत ३५० पेक्षा जास्त स्वयंसेवक दुर्लक्षित राहिल्याचा आरोप युवा सेनेचे रवी निकम यांनी केला आहे. स्वयंसेवकांनी सलग २५ दिवस स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून काम केले. त्याबदल्यात त्यांना सरकारकडून दररोज १०० व महापालिका १०० असे एकूण २०० रुपये मानधन देण्याचे ठरले होते. सरकारकडून आलेले मानधन स्वयंसेवकांना मिळाले. मात्र, महापालिकेकडून मिळणारे मानधन अद्याप मिळालेले नाही, अशी तक्रार निकम यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.
निकम यांनी मानधनासाठी शहरप्रमुख चौधरी व महापौरांकडे दाद मागितल्यावर मानधन देण्याचे आश्वासन मिळाले. काेराेनाच्या काळात शहरात रुग्णसंख्या वाढल्यामुळे पालिका प्रशासन चिंतेत पडले हाेते. मात्र, आयुक्त डाॅ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली आराेग्य व्यवस्थेची सुधारणा करुन रुग्णसंख्या कमी करण्यात अखेर पालिका प्रशासनाला यश आले. पालिकेकडून वारंवार केल्या जाणाऱ्या आवाहनाला शहरातील नागरिक, व्यापारी यांनी चांगला पाठिंबा दिल्यामुळे रुग्णवाढीचा दर खाली आला. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास काेराेनाचा प्रार्दुभाव नक्कीच वाढणार नाही असा विश्वास पालिका प्रशासनाने या निमित्ताने व्यक्त केला आहे.
मानधन लवकरच मिळेल
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत ३५० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. सरकारकडून आलेल्या निधीतून त्यांना पहिल्या टप्प्याचे मानधन दिले. लवकरच पालिकेच्या वतीने देण्यात येणारे मानधन दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे.