उल्हासनगर वाहतूक विभागाची वर्षभरात ९७ हजार १२२ वाहनांवर कारवाई
By सदानंद नाईक | Published: December 24, 2023 07:02 PM2023-12-24T19:02:09+5:302023-12-24T19:02:29+5:30
७ कोटी १४ लाखाचा केला दंड वसूल.
उल्हासनगर : शहरातील उल्हासनगर व विठ्ठलवाडी वाहतूक पोलीस विभागाने नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी वर्षभरात ९७ हजार १२२ वाहनावर कारवाई केली. तर त्यांच्याकडून ७ कोटी १३ हजार ९० हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
उल्हासनगरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी उल्हासनगर व विठ्ठलवाडी वाहतूक पोलीस विभाग कार्यान्वित आहे. विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असतांनाही कारवाई नेत्रदीपक आहे. उल्हासनगर वाहतूक उपविभागाने जानेवारी ते १४ डिसेंबर दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार एकून ५६ हजार ६१२ केसेस करून ४ कोटी ९८ लाख ३६ हजार ३०० रुवयाचा दंड वसूल केला. तर विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाने ४० हजार ५१० वाहनावर केसेस करून २ कोटी १५ लाख ५४ हजार १५० रुवयए दंड वसूल केला. दोन्ही विभागाकडून एकून ९७ हजार १२२ वाहनावर कारवाई करून एकून ७ कोटी १३ हजार ९० हजार ४५० रुपये दंड वसूल केला आहे.
उल्हासनगर उपविभागीय वाहतूक विभागाने वर्षभरात ७ हजार ४४ रिक्षावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, कागदपत्र नसणे, परमिट नसणे आदी कारणांनुसार कारवाई करून ५९ लाख ६३ हजार ९५० रुपये दंड आकारण्यात आला. तसेच लोकअदालतच्या अनुषंगाने ई-चलन भरत नव्हते. अश्या १२५ वाहनाकडून ३ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकूणच वाहतूक पोलिसांनी कामगिरीचे कौतुक होत असताना, शहराला वाहतूक कोंडीतून सुटका करणारी टोईंग गाडी व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे बंद आहे. विठ्ठलवाडी वाहतूक विभागाने मात्र व्यापाऱ्यांच्या विरोधानंतरही टोइंग गाडी सुरू करून बेशिस्त वाहनावर कारवाई करीत आहे. राजकीय पक्ष नेता, व्यापारी, नागरिक आदींनी वाहतूक विभागाला सहकार्य केल्यास, शहरातील वाहतूक कोंडी सोडण्याचे संकेत वाहतूक पोलीस विभागाने दिले आहे.
वॉर्डनच्या पगारात वाढ करण्याची मागणी
शहरात वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने पोलीस वाहतूक विभागाच्या दिमतीला ५० पेक्षा जास्त वॉर्डन दिले. वॉर्डनला दरमहा ६ हजार मानधन दिले जाते. मात्र देण्यात येणारे मानधन कमी असल्याने, शासन नियमानुसार वेतन देण्याची मागणी वाहतूक पोलीस विभागाने महापालिका आयुक्तांकडे केली.