उल्हासनगरात वाहतूक पोलिसांनी भरले रस्त्यातील खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:40 AM2021-09-19T04:40:24+5:302021-09-19T04:40:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वीं रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे न भरल्याने, बहुतांश रस्त्याची दुरवस्था झालेली दिसते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वीं रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे न भरल्याने, बहुतांश रस्त्याची दुरवस्था झालेली दिसते. विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन खड्डयांतून झाले होते. मागील दिवसात बहुतांश खड्डे भरले जातील , अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र खड्डे तसेच आहेत. त्यामुळे गणरायाच्या विसर्जन वाटेतील खड्डयांचे विघ्न कायम आहे, असेच दिसते. तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने सुरू केले. मात्र आता श्रीराम चौकात वाहतूक पोलीसच खड्डे बुजवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उल्हासनगरात गणरायाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून झाले. त्यामुळे गणेशभक्त व वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. दरवर्षी रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी बजाविले जातात. मात्र गेल्या वर्षीपासून रस्तातील खड्डे पावसाळ्यानंतर व गणेशोत्सवापूर्वी बजाविले जातात. यावर्षी संततधार पावसाने रस्त्याची चाळण झाली आहे. त्यातच पावसामुळे दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम राहून गेल्याने, रस्त्याची दुरवस्था झाली. याबाबत पालिका बांधकाम विभागावर टीका होत असून रस्ता दुरुस्ती व खड्डे भरण्यासाठी साडे सहा कोटींची तरतूद केली. संततधार पावसाने रस्त्यातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अश्विनी आहुजा यांनी दिली.
कॅम्प नं-४ श्रीराम चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असते. या परिसरात रस्त्यांवर प्रचंड खड्डे झाल्याने त्याचा परिणाम येथील वाहतुकीवर होतो. यामुळे येथील वाहतूक विभागाचे हवालदार एन डी परदेशी व डी एच कोळी यांनी चौक व रस्त्यातील खड्डे स्वत भरले. वाहतूक पोलिसांनी श्रीराम चौक रस्त्यातील खड्डे भरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर, त्यांच्या कृतीचे स्वागत होत आहे. तर पाऊस थांबल्यावर रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्याचे संकेत शहर अभियंता महेश शितलानी यांनी दिली.