उल्हासनगरमध्ये पाणीपट्टी होणार दुप्पट?; स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 01:21 AM2020-02-08T01:21:52+5:302020-02-08T01:23:35+5:30
जुन्याच योजना पूर्ण करण्याचा मानस
उल्हासनगर : महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी २०२०-२०२१ या वर्षाचे ४८३.४१ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांना शुक्रवारी सादर केले. मालमत्ताकरदरवाढ जैसे थे ठेवून पाणीपट्टीत दुप्पट वाढ केली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचलले असून जुन्या योजना पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.
गेल्या वर्षीचे अंदाजपत्रक ५४९.३७ कोटींचे होते. मात्र, यावर्षी उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवून अंदाजपत्रक सादर केल्याचे आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाने समाधान व्यक्त केले असले, तरी पर्यायी उत्पन्न स्रोताचा विचार केला नाही, असा आरोप भाजप गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी केला. पुढील आठवड्यात सभापती वधारिया अंदाजपत्रक महासभेत सादर करणार आहे.
परिवहन सेवा नसताना समितीसाठी तीन कोटी ५५ लाखांची तरतूद केली. तसेच शिक्षण मंडळाचा खर्च व अंदाजपत्रक निम्म्यावर आणून शाळेच्या दुरुस्तीसाठी तीन कोटींच्या निधीची तरतूद केली. शहरातील मुख्य व इतर रस्त्यांची पुनर्बांधणी एमएमआरडीएच्या निधीतून सुरू आहे. पर्यायी उत्पन्नाचा पालिका शोध घेत असून सरकारी योजनांचा लाभ कसा मिळेल, याबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.