'उल्हासनगरही मेट्रोला जोडणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
By सदानंद सिरसाट | Published: February 16, 2023 03:58 PM2023-02-16T15:58:45+5:302023-02-16T15:59:11+5:30
Ulhasnagar : महापालिका विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी रात्री संच्युरी मैदानाच्या सभेत झाले.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी रात्री संच्युरी मैदानाच्या सभेत झाले. यावेळी उल्हासनगर मेट्रो ट्रेनला जोडणार असल्याची गोड बातमी देऊन सिंधी बांधवासाठी बंद झालेली हरिद्वार रेल्वे सुरू केल्याचे सांगितले. मात्र धोकादायक इमारतीच्या अहवालात दुरुस्ती करणे बाकी असल्याचे सांगून जीआरसाठी वेळ लागणार असल्याची ग्वाही दिली.
उल्हासनगर महापालिका मिस्ट मशीन, अग्निशमन विभागच्या गाड्या, स्वच्छ भारत अभियान मधील गाड्या आदीचे लोकार्पण तर मलनिस्सारण केंद्र, दिव्यानं नागरिक नोंदणीचे सॉफ्टवेअर आदी विकास कामाचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी शहराचा सुयोनियोजित विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले. अवैध बांधकामे नियमित करण्याचे काम झाले असून धोकादायक इमारती मधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही दुरुस्ती बाकी असल्याचे सांगितले. त्यामध्ये दुरुस्ती केल्यावर जीआर प्रसिद्ध करणार असल्याचे म्हणाले. महापालिकेने स्वतःचा पाणी स्रोत निर्माण करणे, ५० एमएलडी वाढीव पाणी, शेजारील वरप, कांबा, म्हारळगावचा विकास, वालधुनी नदीचा विकास, रस्ते बांधणी असा गेल्या ६ महिण्यात एकून १२६० कोटी विकास कामासाठी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सिंधीबहुल शहरवासीयांसाठी बंद पडलेली हरिद्वार रेल्वे सुरू केल्याची गोड बातमी देऊन, मेट्रो रेल्वेला उल्हासनगर जोडणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी चटईक्षेत्रात वाढ केली असून दंड कमी केला आहे. त्यामुळे क्लस्टरद्वारे बांधकामे नियमित होणार असल्याची आशा त्यांनीं व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत शहरवासीय खासदार श्रीकांत शिंदें यांच्यां पाठिशी उभे राहिल्याने, मी शहरवासीयांचा नेहमी ऋणी राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उशिरा आल्याने, सभा व लोकार्पण-उदघाटन सोहळा रात्री सव्वा दहा वाजल्यानंतर सुरू झाला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित असून त्यांच्या कारवाईकडे लक्ष असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली.
महापालिका शहर विकास कामे व लोकार्पण सोहळ्याला केंद्रीयमंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, बालाजी किणीकर, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, प्रियांका रजपूत, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, महापालिका अधिकारी, कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.