कल्याण पूर्वेतील मतमोजणी होणार उल्हासनगरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:19 AM2019-09-26T00:19:43+5:302019-09-26T00:19:53+5:30
मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी स्ट्राँग रूमही तिथेच असणार आहे.
कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघातील मतदान ३४६ केंद्रांवर होणार असले, तरी या मतदारसंघाचाच भाग असलेल्या उल्हासनगरमधील व्हीटीसी ग्राउंड येथील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. मतदान प्रक्रियेच्या साहित्याचे वाटप तेथेच होणार आहे. मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी स्ट्राँग रूमही तिथेच असणार आहे.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात कल्याण पूर्वचा भाग, अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग, नेवाळीनाका या परिसरातील काही गावांसह उल्हासनगरमधील पाच प्रभाग मोडतात. या मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय पूर्वेतील महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयात उघडण्यात आले आहे. या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मतदान प्रक्रियेची माहिती दिली.
उमेदवारी अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी करणे, अर्जांची माघार आदी प्रक्रिया ‘ड’ प्रभाग कार्यालयात होणार आहेत. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्जांचे वितरण आणि अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ४ आॅक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पार पडणार आहे. ५ आॅक्टोबरला अर्जांची छाननी, ७ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया होणार आहे. २१ आॅक्टोबरला ३४६ केंद्रांवर मतदान होणार आहे. तर, २४ आॅक्टोबरला मतमोजणी उल्हानगरमधील व्हीटीसी ग्राउंडवरील बॅडमिंटन हॉलमध्ये होईल.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात तीन लाख ४४ हजार ३६९ मतदार असून, त्यात २०८ दिव्यांग मतदार आहेत. आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी चार विशेष पथके स्थापन केली आहेत. मतदान प्रक्रियेतील सर्व परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे मिळणार आहे. या मतदारसंघात निवडणूक यंत्रणा राबविण्यासाठी एक हजार ९०० अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत, अशी माहिती भांडे-पाटील यांनी दिली.
अत्रे रंगमंदिरात प्रशिक्षण : २७ सप्टेंबर आणि १० आॅक्टोबरला दोन सत्रांत पूर्व मतदारसंघातील निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिरात होणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुसरे सत्र दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे.