उल्हासनगरचा ठाणेच्या धर्तीवर विकास करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 06:46 PM2021-09-07T18:46:00+5:302021-09-07T18:46:38+5:30
धोकादायक इमारतीतील नागरिकांना मिळणार हक्काचें घर, स्टेडियमचे भूमिपूजन तर विकास कामचे लोकार्पण
सदानंद नाईक
उल्हासनगर : व्हिटीसी मैदानात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन तर जलशुद्धीकरण केंद्र, अत्याधुनिक बोटी व भुयारी गटार साफ करणाऱ्या रॉबर्टचे ऑनलाईन लोकार्पण सोहळा पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी व्हिटीसी ग्राऊंड येथे झाले. ठाणेच्या धर्तीवर उल्हासनगरचा विकास करणार असून धोकादायक इमारती मधील नागरिकांना हक्काचे घर मिळणार असल्याचे सांगितले.
उल्हासनगरातील व्हिटीसी मैदानात २५ कोटीच्या निधीतून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने क्रीडा संकुल उभे राहणार असून क्रीडा संकुलाचे भूमिपूजन पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच वडोलगाव व शांतीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्र, महापालिका अग्निशमन दलात दाखल झालेल्या अत्याधुनिक बोट व भुयारी गटार साफ करण्यासाठी रॉबर्टचा उपयोग करण्यात येणार असून त्यांचे ऑनलाईन लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते झाला. शहरात विकास कामाला गती आली असून विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे आश्वासन पालकमंत्री यांनी देऊन ठाणेच्या धर्तीवर शहरविकास करणार असल्याचे सांगितले. तसेच धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अध्यादेशानव्ये दंड कमी करण्याची हमी देऊन, सर्वांना हक्काचे घर मिळणार असल्याचे आश्वासन दिले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य क्रीडा संकुल उभे राहणार असून संकुलाला निधी कमी पडू देणार नाही. असे आश्वासन दिले. तसेच भविष्यात येथून राष्ट्रीय स्तरावर खळाडू निर्माण होणार असल्याचे शिंदे म्हणाले. शहरातील राजकीय नेत्यांनी आपसात न भांडता शहर विकासासाठी मोठे प्रकल्प राबवून शहरहित साधा. असा सल्लाही दिला. नगरविकास विभागाने अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. यामुळे समृद्धी महामार्गा प्रमाणे इतर रस्ते उभे राहिले. महापालिकेने कोणतीही स्वतःची यंत्रणा नसतांना कोविड काळात उत्तम काम केले असून सर्व सुविधा याकाळात निर्माण केल्याचे ते म्हणाले. महापौर लिलाबाई अशान, आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या कामाचे कौतुक केले.
लोकार्पण कार्यक्रमाला नेत्यांची हजेरी
विकास कामाच्या लोकार्पण व क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, महापौर लिलाबाई अशान, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे, राष्ट्रवादीचे गटनेते भारत गंगोत्री, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, गटनेते गजानन शेळके, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक धनंजय बोडारे, अरुण अशान आदीजण उपस्थित होते.