‘उल्हासनगर होणार गुन्हेगारमुक्त’
By admin | Published: February 15, 2017 04:39 AM2017-02-15T04:39:47+5:302017-02-15T04:39:47+5:30
आधीच्याच वचननाम्यातील अनेक योजनांसह नव्या भरपूर घोषणांचा वर्षाव करणारा शिवसेनेचा वचननामा मंगळवारी प्रसिद्ध झाला.
उल्हासनगर : आधीच्याच वचननाम्यातील अनेक योजनांसह नव्या भरपूर घोषणांचा वर्षाव करणारा शिवसेनेचा वचननामा मंगळवारी प्रसिद्ध झाला. उल्हासनगरला दहशतवाद व गुन्हेगारमुक्त करण्यासाठी शिवसेनेला मतदान करण्याचे साकडे खा. श्रीकांत शिंदे, आ. बालाजी किणीकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी घातले.
शिवसेना व भाजपाचा वचननामा वेगळा असला, तरी बहुंताश मुद्दे एकच आहेत. भाजपाने वचननामा प्रसिध्द करण्यात बाजी मारली असली, तरी त्यात फारसे नवे मुद्दे नसल्याची टीका सुरू आहे. गेली दहा वर्षे पालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता होती. त्यानंतरही मूलभूत प्रश्न सोडवण्याची आश्वासने दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात आहेत.
वचननाम्यातील वैशिष्ट्ये
वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत, गृहसंकुलांना कर सवलत, धोकादायक इमारतीचे पुनर्वसन, क्लस्टर योजना लागू करणे, विकास आराखड्याला मंजुरी, मुंबईच्या धर्तीवर पुनर्वसन, अद्ययावत व्यापारी संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रेल्वे स्टेशन परिसरात सॅटीस प्रकल्प, वालधुनी नदीवर पूल, केंद्र व राज्य शासनाच्या मदतीतून अनेक योजना पूर्ण करण्याचे आश्वासन, डम्पिंग ग्राऊंड, बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, मुबलक पाणी, अद्ययावत नाट्यगृह यांचा समावेश आहे.
जुन्या वचननाम्याला रंगरंगोटी
शिवसेनेने २००७ व २०१२ च्या पालिका निवडणुकीतील वचननामाच पुन्हा प्रसिध्द केला की काय, असा प्रश्न पडण्याइतक्या योजना, कामांचा त्यात समावेश आहे.
दहशतवादमुक्तीची हाक
भाजप व ओमी कलानी टीम एकत्र येताच शिवसेनेने दहशतवाद व गुन्हेगारमुक्त शहराची हाक दिली. (प्रतिनिधी)