उल्हासनगराला एकाच दराने मिळणार पाणी!
By सदानंद नाईक | Published: October 1, 2022 04:39 PM2022-10-01T16:39:52+5:302022-10-01T16:40:27+5:30
शहाड येथील पाणीपुरवठा योजनेचेही होणार हस्तांतरण
सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्या बाबत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत उधोगमंत्री उदय सामंत यांच्याशी बैठक होऊन शहाड येथील पाणी पुरवठा योजना महापालिकेला हस्तांतर करण्याचे संकेत दिले. तसेच पाण्याचा दर एकच राहणार असल्याचा निर्णय घेतल्याने, महापालिकेला एमआयडीसीकडून एकाच दराने पाणी पुरवठा होणार आहे.
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचा पाणी स्त्रोत नसल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या आठवड्यात शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढला होता. खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन शहरातील काही पदाधिकार्यासह शुक्रवारी उधोगमंत्री उदय सावंत यांची भेट घेतली. शहराला दररोज १२० दशलक्ष लिटर पर्यंत पाण्याचे दर ८ तर त्यापुढील पाणी १२ रूपये प्रति हजार लिटर दराने आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यापुढे एकाच दराने पाणी देण्याबाबत धोरण ठरवण्याचे आदेश एमआयडीसीला दिल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या समस्यांवर श्रीकांत शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन शुक्रवारी केली. यावेळी महापालिका अधिकारी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सामंत यांच्यासमोर समस्या मांडल्या. शहरातील एमआयडीसीच्या शहाड पाणी पुरवठा योजना महापालिकेला हस्तांतरीत करा. अशी मागणी स्थानिक नेते व महापालिकेची होती. या मागणीला राज्याचे उद्योगमंत्री आणि एमआयडीसीचे प्रमुख उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रसिद्धी पत्रकात शिंदे सांगितले. याव्यतिरिक्त शहराला उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस फिडरला उद्योग मंत्र्यांनी मंजुरी दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले. महापालिका एमआयडीसीला पाणी बिलापोटी प्रतिमहा ३ कोटी ७५ लाखांचे बिल आकारते. मात्र महापालिका फक्त अडीच कोटींचे बिल अदा करते. त्यामुळे महापालिकेची पाणी बिलाची थकबाकी ६६७ कोटी १६ लाखांवर पोहोचल्याचे शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले.