उल्हासनगरच्या सुमन सचदेव यांचे नगरसेवक पद अवैध, राष्ट्रवादीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 09:05 PM2019-02-07T21:05:57+5:302019-02-07T21:06:10+5:30
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र-१७ मधून राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री, सुनीता बगाडे, सतरामदास जेसवानी व पूजा कोर लभाना निवडून आले होते.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका प्रभाग क्र-17 मधून राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सुमन सचदेव यांचे नगरसेवक पद जिल्हा जात प्रमाणपत्र पडताडणी समितीने अवैध ठरविले. या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया सचदेव यांनी दिली असून निर्णयाबाबत सर्वांच्या नजरा महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे लागल्या आहेत.
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र-१७ मधून राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री, सुनीता बगाडे, सतरामदास जेसवानी व पूजा कोर लभाना निवडून आले होते. पूजा कोर लभाना यांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर काँग्रेसच्या पराजीत व प्रतिस्पर्धी उमेदवार जया साधवानी यांनी आक्षेप घेतला होता. जात प्रमाणपत्र पडताडणी समितीने पूजा लभाना यांचे नगरसेवक पद रद्द केल्यावर, एप्रिल 2018 मध्ये पोटनिवडणूक होऊन राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर सुमन सचदेव नगरसेवक पदी निवडून आल्या. जया साधवानी यांनी नवनिर्वाचित नगरसेविका सुमन सचदेव यांच्या जात प्रमाणपत्राला जिल्हा जात प्रमाणपत्र समितीत आवाहन दिल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताडणी समितीचे अध्यक्ष सतीश देशमुख, संशोधन अधिकारी उज्वला सफकाळे, समिती सदस्य उमेश सोनावणे यांनी सुमन सचदेव यांच्या बहिणी, भाऊ, काका, मामा, वडील आदी नातेवाईकांचे जातप्रमानपत्र तपासले असता, बावा जात आढळून न आल्याने, सुमन सचदेव यांचे बावा जातीचे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवून नगरसेवक पद अवैध ठरविली आहे. जिल्हा जातप्रमानपत्र पडताडणी समितीच्या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया सुमन सचदेव यांनी दिली.