उल्हासनगरची दारूबंदी मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:30 AM2017-07-19T02:30:15+5:302017-07-19T02:30:15+5:30
उल्हासनगरात दारूबंदी करावी, असा प्रस्ताव सभागृहनेते जमनु पुरस्वानी यांनी मंगळवारच्या विशेष महासभेत मांडला. पण चर्चेअंती त्यांनी त्तो मागे घेतला.
- लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : उल्हासनगरात दारूबंदी करावी, असा प्रस्ताव सभागृहनेते जमनु पुरस्वानी यांनी मंगळवारच्या विशेष महासभेत मांडला. पण चर्चेअंती त्यांनी त्तो मागे घेतला. या प्रस्तावामुळे दारू विक्रेते भाजपावर नाराज झाले होते. त्यामुळे आर्थिक देवाणघेवाणीतूनच प्रस्ताव मागे घेण्यात आला अशी टीका विरोधी आणि भाजपा सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केली. दरम्यान, दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणांनी सभागृह मात्र दणाणून गेले.
रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव, भारिपच्या कविता बागूल, पीआरपीचे प्रमोद टाले, भाजपा नगरसेविका रेखा ठाकूर यांच्यासह अन्य नगरसेवकांनी दारूबंदी झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली. पुरस्वानी, शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री, भाजपाचे राजेश वधारिया, साई पक्षाचे टोणी सिरवानी यांनी दारूबंदीसाठी विशेष महासभेची मागणी महापौर मीना आयलानी यांच्याकडे केली होती. त्यानुसार ती झाली. दारूबंदीचा विषय येताच पुरस्वानी यांनी प्रस्ताव मागे घेत असल्याचे सांगितले. प्रस्ताव मागे घेऊ नका, अशी मागणी भालेराव यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांनी केली. त्यावरून एकच गोंधळ झाला.
आधीच ५०० मीटर अंतराच्या नियमामुळे दारू विक्रेते हैराण झाले आहेत. त्यांनी राजकीय नेत्यांच्या पायऱ्या झिजवणे सुरू केले. त्यातच दारूबंदीच्या प्रस्तावामुळे व्यापाऱ्यात असंतोष निर्माण झाला होता. मात्र प्रस्ताव मागे घेतल्याने दारूमुळे उद्धस्त होणारे संसार वाचवण्यासाठी आंदोलनाचा इशारा भालेराव यांच्यासह इतर पक्षांच्या नगरसेवकांनी दिला.