उल्हासनगरची लोकसंख्या घनतेत मुंबईहूनही अधिक
By admin | Published: January 3, 2017 05:40 AM2017-01-03T05:40:13+5:302017-01-03T05:40:13+5:30
राज्याची राजधानी मुंबईचा जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या महानगरांत समावेश झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र
नारायण जाधव, ठाणे
राज्याची राजधानी मुंबईचा जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या महानगरांत समावेश झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र, मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात लघू उद्योगांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहराने यावर कडी केली आहे.
२०११ च्या जनगणणेनुसार उल्हासनगरची लोकसंख्येची घनता मुंबई शहारापेक्षा तब्बल दहा हजारांहून अधिक तर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठाणे शहरापेक्षा तब्बल २४ हजाराहून आहे. मुंबईची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमिटरला २८ हजार ४२६ आहे. तर उल्हासनगरची सुमारे ३८ हजार ९३१ इतकी प्रचंड आहे. तर ठाणे शहराची लोकसंख्या घनता १४ हजार ३६१ इतकी आहे. ठाणे शहराहून अधिक लोकसंख्येची घनता उल्हासनगर पाठोपाठ भिवंडी २६ हजार ८७१ आणि कल्याण-डोंबिवली २२ हजार २१८ यांची आहे. एमएमआरडीएनेच आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. उल्हासनगरचे भौगोलिक क्षेत्रफळ अवघे १३ चौरसकिलोमिटर असल्याने त्यांची लोकसंख्या घनता देशात कदाचित सर्वाधिक असावी.
देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि महापालिका असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. २०११ च्या जनगणणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी १० लाख ६ हजार १४८ इतकी आहे. जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, भिवंडी अशा सहा महापालिका आहेत. तर वसई-विरारचा नव्या पालघर जिल्ह्यात गेले आहे. राजधानी मुंबईत लोकसंख्येचा वृद्धीचा स्थीर असला तरी २००१-११ च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या अडीच लाखाहून कमी झालेली आहे. तो नजिकच्या ठाणे जिल्ह्यात मात्र वाढला आहे. यात ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि वसईचा वेग झपाट्याने वाढत आहे. पाठोपाठ अंबरनाथ-बदलापूर, उरण-पनवेलची लोकसंख्याही वेगाने वाढत असल्याचे एमएमआरडीएने केलेल्या अभ्यासात उघड झाले आहे.
मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी विभागाची लोकसंख्येची घनता ही एकूण सकल लोकसंख्येच्या तिप्पट आहे. महानगर प्रदेशातील एकूण ८६.२६ टक्के लोकसंख्या महापालिका क्षेत्रातील आहे. त्यात मुंबईचा वाटा ५४.५६ तर उर्वरित सात महापालिकांचा वाटा ३२.०७ टक्के इतका आहे. या सातपैकी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या चार महापालिका दहा लाखाहून लोकसंख्येच्या आहेत. उर्वरित तीन महापालिकाही
लवकरच दहा लाखांच्या होतील, असा अंदाज आहे.