उल्हासनगरच्या भाजी मंडयांना लागली घरघर
By Admin | Published: January 2, 2017 03:50 AM2017-01-02T03:50:07+5:302017-01-02T03:50:07+5:30
निवडणुका तोंडावर आल्याने उल्हासनगर स्मार्ट करण्याचे स्वप्न दाखवण्याच्या, विकासाचे पॅकेज देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.
निवडणुका तोंडावर आल्याने उल्हासनगर स्मार्ट करण्याचे स्वप्न दाखवण्याच्या, विकासाचे पॅकेज देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. निवडणूक जाहीरनाम्यात तशी आश्वासने दिली जातीलही. पण अस्तित्वात असलेल्या सुविधांकडे प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर त्यांची कशी दुरवस्था होते याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे उल्हासनगरच्या भाजी मंडया. पालिका पथकांचे दुर्लक्ष, विक्रेत्यांनी फिरवलेली पाठ यामुळे या मंडया ओसाड पडल्या आहेत. त्यांच्या अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत. '
उल्हासनगर महापालिकेने १९९० ते ९५ दरम्यान कॅम्पनुसार भाजी मंडया बांधल्या. सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात आणि सोयीच्या ठिकाणी भाजी मिळावी, हा त्यामागील उद्देश होता. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील सर्व मंडया अखेरच्या घटका मोजत आहेत. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या इमारती आज धोकादायक झाल्या आहेत. या इमारतींच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी भाजीविक्रेते बसण्यास धजत नाहीत. आज या भाजी मंडयांसमोरच भाजीपाल्याच्या बेकायदा गाड्या उभ्या राहत आहेत. यावर पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
मार्केटची भाडेवसुली पालिकेऐवजी गावगुंड करीत आहेत. या मंडयांमध्ये साफसफाईच केली जात नसल्याने सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. उघड्यावर फेकलेला भाजीपाल्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या इमारतींची पालिकेने दुरुस्तीच केली नसल्याने त्या धोकादायक अवस्थेत आल्या आहेत. त्या केव्हाही कोसळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुरवस्थेमुळे इमारतींना गळती लागली आहे. अतिधोकादायक झालेल्या इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागेवर अंबरनाथ-कल्याण रस्ता रुंदीकरणातील बाधित व्यापाऱ्यांना गाळे बांधून देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजी मंडईचे अस्तित्वच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
कॅम्प नं.-३ येथील एकेकाळचे सुसज्ज इंदिरा गांधी भाजी व मटण मार्केट अतिधोकादायक झाले आहे. मंडईला चारही बाजूंनी अतिक्रमणांचा विळखा पडूनही कारवाई झालेली नाही. मटण मार्केटचीही दुरवस्था झाली आहे. तसेच उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ बांधलेले मच्छी मार्केट १५ वर्षांपासून वापराविना पडून आहे. तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी त्या जागी सुसज्ज मार्केट बांधण्याची संकल्पना मांडली होती. पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनीही या मार्केटची पाहणी करून त्याजागी नवे मार्केट बांधण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मासेविक्रेते रस्त्यावरच बसून व्यवसाय करत असल्याने रेल्वे स्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे.