उल्हासनगरच्या तरुणाची आत्महत्या, लोकलखाली दिला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 01:11 AM2019-07-19T01:11:04+5:302019-07-19T01:11:06+5:30
ठाण्यात औषधोपचारासाठी आलेल्या आकाश चंद्रकांत होळकर (२४) या तरुणाने ठाणे रेल्वेस्थानकात लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.
ठाणे : वडिलांसोबत ठाण्यात औषधोपचारासाठी आलेल्या आकाश चंद्रकांत होळकर (२४) या तरुणाने ठाणे रेल्वेस्थानकात लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. लोकल थांबवून त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उल्हासनगर येथील आकाश हा मानसिक रुग्ण असल्याने त्याच्यावर ठाण्यात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी तो वडिलांसोबत औषधोपचारासाठी ठाण्यात आला होता. त्यानंतर, ते दोघे सकाळी ११.३५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातून घरी परतीच्या प्रवासासाठी ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक दोन येथे लोकलची वाट पाहत बसले होते. कल्याण ही लोकल फलाटावर आली असताना त्यावेळी आकाशने अचानक उठून तिच्याकडे पाहू लागला.
ती फलाटावर लागल्यावर त्याने स्वत:ला झोकून दिले. लोकलची धडक लागून तो रुळांच्या मधोमध पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला.
रेल्वे प्रशासनाने लोकल उभी करून कर्मचारी आणि हमाल यांच्या मदतीने त्याला लोकलखालून तातडीने काढून प्रथमोपचार करून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले.
>गुन्हा दाखल
तेथील डॉक्टरांनी त्याला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने काहीकाळ रेल्वेस्थानक परिसरात खळबळ उडाली.