उंबर्डे घनकचरा प्रकल्प पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:24+5:302021-07-23T04:24:24+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाचा उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प अतिवृष्टीमुळे गुरुवारी पाण्याखाली गेला आहे. या प्रकल्पातील कचरा पाण्यात पसरल्याने आसपासच्या ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाचा उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प अतिवृष्टीमुळे गुरुवारी पाण्याखाली गेला आहे. या प्रकल्पातील कचरा पाण्यात पसरल्याने आसपासच्या २०० एकर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे; तसेच कचऱ्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उंबर्डे घनकचरा प्रकल्प हा नदी व खाडी किनाऱ्यापासून जवळ आहे. अतिवृष्टीमुळे खाडी व नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाणी उंबर्डे गावात शिरले आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्प पाण्याखाली गेला आहे. प्रकल्पातील कचरा व दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात तसेच शेतात पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिक व शेतकरी बबन कारभारी म्हणाले की, सरकारच्या पर्यावरण नियमानुसार पाणथळ जागेजवळ कचरा प्रकल्प नसावा. या प्रकल्पास स्थानिकांचा सुरुवातीपासून विरोध आहे; मात्र केडीएमसीने हा विरोध न जुमानता प्रकल्प उभारला. त्याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया कमी आणि कचरा साठवून ठेवण्याचे काम जास्त होत आहे. पावसामुळे या प्रकल्पाची पोलखोल झाली आहे. शहरातील अन्य ठिकाणी प्रकल्प राबविण्याऐवजी उंबर्डेत तो राबविण्याचे कारण काय? उंबर्डेत नागरिक राहत नसून जनावरे राहतात का? प्रकल्प बंदिस्त करण्याची आमची मागणी होती; मात्र तीही मनपाने पूर्ण केलेली नाही. त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एकतर हा प्रकल्प बंद करावा, अन्यथा आम्हाला विष देऊन मारून टाकावे, याकडे कारभारी व चिंतामणी लोखंडे यांनी लक्ष वेधले आहे.
बारावे घनकचरा प्रकल्पासही अतिवृष्टीचा फटका
बारावे घनकचरा प्रकल्पासही स्थानिक नागरिकांचा विरोध होता; मात्र तो न जुमानता प्रकल्प राबविला आहे. हा प्रकल्पही नदी किनाऱ्यापासून जवळच आहे. अतिवृष्टीमुळे गुरुवारी या प्रकल्पात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि विरोध योग्यच होता, हे अतिवृष्टीमुळे उघड झाले आहे, याकडे स्थानिक सुनील घेगडे यांनी लक्ष वेधले आहे.
----------------------