उंबर्डे, बारावे प्रकल्पाची आज जनसुनावणी, नागरिकांचा घनकचरा प्रक्रियेला विरोध असल्याने लागले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:49 AM2017-11-08T01:49:38+5:302017-11-08T01:49:38+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका उंबर्डे व बारावे येथे उभारत असलेल्या शास्त्रोक्त भरावभूमी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका उंबर्डे व बारावे येथे उभारत असलेल्या शास्त्रोक्त भरावभूमी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत उद्या (बुधवार) ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कल्याणच्या अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये जनसुनावणी आयोजित केली आहे. ही जनसुनावणी घेण्याचे आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने जिल्हाधिकाºयांना दिले होते.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाच्या उभारणीत दिरंगाई केली जात असल्याने उच्च न्यायालयात कौस्तुभ गोखले यांनी जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने हरीत लवादाकडे वर्ग केली. महापालिकेने आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी २९ कोटी ५३ लाख रुपयांची निविदा मागवली आहे. त्याचे कार्यादेश कंत्राटदार कंपनीला दिले आहेत. त्याच धर्तीवर महापालिकेने उंबर्डे व बारावे येथे शास्त्रोक्त पद्धतीने भरावभूमी व घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविली होती. उंबर्डेसाठी १९ कोटी ६६ लाख रुपये तर बारावेसाठी ११ कोटी ३८ लाख रुपये खर्चाची निविदा मागवून कंत्राटदाराला ते काम करण्याचे कार्यादेश दिले आहेत. उंबर्डे येथे घनकचºयाचे वर्गीकरण करण्यात येणार असून तेथे ओल्या कचºयापासून बायोगॅस तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खत निर्मिती केली जाणार आहे. प्लॅस्टीक कचºयावर प्रक्रिया करुन त्यापासून उर्जा तयार केली जाणार. ‘वेस्ट टु कंम्पोज’ आणि ‘वेस्ट टु एनर्जी’ अशा दोन प्रकारे प्रक्रिया केली जाणार आहे.
प्रकल्प सुरु करण्यापूर्वी पर्यावरण खात्याचा ना हरकत दाखला घेणे अपेक्षित होते. तो न घेताच प्रस्ताव तयार केला गेला आहे. त्याला याचिकाकर्त्यांनी हरकत घेतली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांनी याकरिता महापालिकेच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. प्रकल्प आणि रहिवासी यांच्यामध्ये बफर झोन असणे अपेक्षित आहे. मात्र त्याठिकाणी बफर झोन नसल्याचे निदर्शनास आले आहे. आधारवाडी डंपींग ग्राऊंडचा नागरीकांना त्रास होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याने ते बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र अद्याप आधारवाडी बंद करण्याची प्रक्रिया सुरु झालेली नाही. आधारवाडीपासून धडा न घेता महापालिकेने उंबर्डे व बारावेचा प्रकल्प हाती घेतला. उंबर्डे व बारावे याठिकाणी प्रकल्पास स्थानिक नागरीकांचा प्रखर विरोध आहे. बारावे परिसरातील नागरीकांनी प्रकल्पाला विरोधात महापालिकेवर मोर्चा काढला होता. यापूर्वीच्या कंत्राटदाराने प्रकल्पास विरोध झाल्याने ४८ लाख रुपयांच्या अनामत रक्कमेवर पाणी सोडून पळ काढला होता. नव्या कंत्राटदारालाही विरोध होत आहे. प्रकल्प सुरु करायचा असल्यास पोलीस बंदोबस्तात करावे लागले, अशी स्थिती आहे.