गृहनिर्माण प्रकल्पासाठी ‘उंभार्ली’ला सुरुंग! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:32 AM2021-01-06T00:32:06+5:302021-01-06T00:32:14+5:30

टेकडी वाचविण्यासाठी निसर्गप्रेमींचे आंदोलन : वृक्षसंपदा धोक्यात : बच्चे कंपनीचाही सहभाग

'Umbharli' mine for housing project! | गृहनिर्माण प्रकल्पासाठी ‘उंभार्ली’ला सुरुंग! 

गृहनिर्माण प्रकल्पासाठी ‘उंभार्ली’ला सुरुंग! 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
कल्याण : म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी डोंबिवलीजवळील उंभार्ली टेकडी पोखरण्यात येत आहे. त्यामुळे टेकडी व पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. ही टेकडी वाचविण्यासाठी मंगळवारी सकाळी निसर्गप्रेमींनी आंदोलन केले. त्यात बच्चे कंपनीही सहभागी झाली होती. टेकडी संवर्धनाकडे वनविभागाचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.


डोंबिवलीचा श्वास असलेल्या या टेकडीवर संत सावळाराम महाराज वनश्री संस्थेकडून झाडे लावली आहेत. या टेकडीवर सकाळी रपेट व व्यायाम करण्यासाठी अनेक नागरिक येतात. तेच या टेकडीचे संवर्धन करत असून, चार हजारांपेक्षा जास्त झाडांना पाणी घालून जगविले जात आहे. या टेकडीवर १३२ प्रकारचे पक्षी पाहावयास मिळतात. मात्र, गृहनिर्माण प्रकल्पांमुळे ही टेकडी धोक्यात आली आहे. शेजारीच पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधली जात आहेत. म्हाडाकडून सुरुंग लावून टेकडीवरील दगड फोडण्यात येत आहेत, तसेच मातीही खणली जात आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे येथील जंगल वाचविले. त्याच धर्तीवर उंभार्ली टेकडी वाचवावी, अशी मागणी यावेळी निसर्गप्रेमींनी केली. या आंदोलनात निसर्गप्रेमी मंगेश कोयंडे, विजय भामरे, भास्कर पाटील, अनंता पाटील, बंडू पाटील, मनसेचे राजेश कदम, सागर जेधे आदी सहभागी झाले होते. सरकारने या आंदोलनाची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निसर्गप्रेमींनी यावेळी दिला.

पर्यावरणास धोका नको : मनसेची भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क 
कल्याण : टेकडीच्या पर्यावरणाला धोका होता कामा नये, अशी ताकीद मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना दिली. या टेकडीवर निसर्गप्रेमींनी आंदोलन केले असता पाटील, म्हाडाचे अधिकारी सुदीप भडांगे, वन अधिकारी कल्पना वाघिरे आणि कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी तेथे आले.
पाटील म्हणाले की, ‘टेकडी पोखरली जात असल्याने तिला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी निसर्गप्रेमी व अनेक संस्थांनी केल्या होत्या. यापूर्वीही मी या टेकडीला भेट देऊन येथे बॉटनिकल गार्डन तयार करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, म्हाडा प्रकल्पासाठी टेकडीला सुरुंग लावून दगड फोडत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची त्यासाठी परवानगी घेतली आहे का, याची विचारणा करणार आहे. गरिबांच्या घरांना विरोध नाही. मात्र, टेकडीला धोका होता कामा नये.’
म्हाडाचे सुदीप भडांगे म्हणाले की,“पंतप्रधान आवास योजनेसाठी सरकारी जागेवर गृहनिर्माण प्रकल्प उभारला जात आहे. त्याचा टेकडीला कोणताही धोका नाही.”


बॉटनिकल गार्डन मंजूर
वाघिरे म्हणाल्या, ‘वनविभागाकडे कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी कर्मचारी पोहोचू शकत नाहीत. पाटील यांचा बॉटनिकल गार्डनचा प्रस्ताव वनविभागाला मिळाला असून, त्याला मान्यताही मिळाला आहे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल.’

Web Title: 'Umbharli' mine for housing project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.