बाबांच्या त्यागाची तुलना अशक्य- सिने दिग्दर्शक विजू माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 09:29 AM2020-12-13T09:29:24+5:302020-12-13T09:39:59+5:30
शारदा प्रकाशाच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन ऑनलाइन पार पडले.
ठाणे : "आईच्या त्यागाची महती नेहमीच गायली जाते. पण बाबांच्या त्यागाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही . कणखर पण पहाडी प्रेम करणारे बाबा अख्खे घर खांद्यावर घेऊन लढत असतात "असे भावनोदगार प्रसिद्ध सिने दिग्दर्शक, लेखक विजू माने यांनी काढले. शारदा प्रकाशन आणि ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनने आयोजित केलेल्या लेखिका - कवयित्री प्रज्ञा पंडित यांच्या ' बाबा (संपादित काव्यसंग्रह) , प्रज्ञाक्षरे , काव्यलिपी या पुस्तकांच्या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून सीताराम राणे उपस्थित होते .
यावेळी सर्व सहभागी कवींचे कौतुक करताना विजू माने म्हणाले" 'बाबा' हा विषय अतिशय हृदयस्पर्शी आहे. आईबद्दल नेहमीच लिहिले-बोलले जाते पण बाबांच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पाठवलेल्या कवितांमधून निवडक कविता घेत कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी अतिशय कल्पकतेने 'बाबा ' या विषयावरील महाराष्ट्रातील अनेक कवींच्या कवितांचे यशस्वी संपादन केले आहे. व्यक्त होणे यासारखा दुसरा आनंद नाही. हा आनंद या कठीण प्रसंगी या कवींनी दिला आहे. समाजावरील दुःखाचे मळभ घालवायचे असेल तर काव्याक्षरे अधिक प्रमाणात व्यक्त झाली पाहिजेत."
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनिष पंडित यांनी उपस्थितांचे कल्पकतेने स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते तिन्ही पुस्तकांचे अनोख्या पद्धतीने प्रकाशन करण्यात आले.
" ज्याच्या अमर्याद मेहनतीच्या जोरावर आपले आयुष्य उभे राहते ते म्हणजे आपले बाबा " अशी काव्यमय सुरुवात करून कवयित्री प्रज्ञा पंडित आपल्या मनोगतात म्हणाल्या ", जगण्याची जिद्द आणि उमेद ज्यांच्यामुळे वाढते त्या आपल्या बाबांचे आपल्या आयुष्यात वेगळे स्थान असते. देव्हाऱ्यात देव असतो आणि आपल्या प्रगतीच्या ,यशाच्या वाटेवर आपले 'बाबा ' असतात. म्हणूनच या अनेक कवींच्या कवितांतून संघर्षाला साद घालणारे कणखर बाबा आपल्याला भेटतात. शब्दबद्ध होतात. जगणे समृद्ध करणाऱ्या या साहित्यिक प्रवासात एकाचवेळी तीन पुस्तके प्रकाशित होणे हे माझ्या बाबांचेच देणे आहे असे मी मानते."
"बाबा , का केवळ शब्द नसून आयुष्य भारून टाकणारा मंत्र असल्याचे सांगून ठाणे डिस्ट्रिक्ट को - ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे म्हणाले," आजपर्यंत आईचे जितके कौतुक झाले त्यामानाने बाबा दुर्लक्षितच राहिले. आईचे महत्व कोणीही नाकारणार नाही ,पण घराचा आधारस्तंभ म्हणून मेढीचे लाकूड होणाऱ्या बाबांना या काव्यसंग्रहातून कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी न्याय दिला आहे. त्यांनी अनेक कवींना लिहिते केले आहे .या काव्यसंग्रहात महाराष्ट्रातील अनेक कवींच्या कविता आहेत. कवयित्री प्रज्ञा पंडित या काव्यसंग्रहाचा दुसरा भागही प्रकाशित करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला." महाराष्ट्रातील सर्व कवींच्यावतीने कवी प्रसाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाशन सोहळ्याचे शैलीदार सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन मनिष पंडित यांनी केले. या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील दोनशेहून अधिक कवी- लेखक सहभागी झाले होते.