उल्हासनगरात महाराष्ट्र दिनावर अघोषित बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 03:34 AM2018-05-02T03:34:27+5:302018-05-02T03:34:27+5:30
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, अतिरिक्त आयुक्त विजय कंठे यांच्यासह अन्य अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्याने
उल्हासनगर : महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, अतिरिक्त आयुक्त विजय कंठे यांच्यासह अन्य अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्याने, शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. महत्त्वाच्या व्यक्तींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने अखेर जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना उल्हासनगरात मात्र लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचा निरुत्साह ठळकपणे जाणवला. महापालिका प्रांगणातील ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा महापौरांच्या हस्ते होतो, अशी प्रथा आहे. मात्र महापौर, आयुक्त, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त अन्य अधिकारी व सर्व नगरसेवकांनी अघोषित बहिष्कार टाकल्याने ध्वजारोहणाची जबाबदारी महापालिका जनसंपर्क अधिकारी भदाणे यांच्यावर आली. यावेळी महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, सहायक आयुक्त गणेश शिंपी, शहर अभियंता महेश शितलानी, यशवंत सगळे, बाळू नेटके आदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती जया माखिजा, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, गटनेता रमेश चव्हाण, विशेष व प्रभाग समितीचे सभापती, विविध पक्षांचे नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त विजया कंठे, उपायुक्त संतोष देहरकर, सहायक आयुक्त, विविध विभागांचे प्रमुख, मुख्य लेखापरीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी व लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचा विसर कसा पडला, अशी टीका होत आहे.