अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन - जितेंद्र आव्हाड
By अजित मांडके | Published: May 27, 2024 03:11 PM2024-05-27T15:11:58+5:302024-05-27T15:13:50+5:30
अनाधिकृत बांधकामे ही काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन झाले असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
ठाणे : अनाधिकृत बांधकामे ही काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन झाले असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महिना १५ लाखांची मागणी काही नेत्यांकडून केली जात असून ते दिले नाही तर आमचे ऑफिस कसे चालणार असा सवालही केला जात आहे. याशिवाय निवडणुकीसाठी अनाधिकृत बांधकामाचे पैसे काहींना हवे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले नंतरही आजही कळवा, मुंब्य्रात ही बांधकामे उभी राहत असल्याचेही ते म्हणाले.
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या दोन दिवसात कळवा, मुंब्य्रात सध्या सुरु असलेल्या अनाधिकृत बांधकामांची यादीच सादर करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. कळवा गावात, व्यायामशाळेशेजारी कोणाची बांधकामे सुरु आहेत, त्याचीही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी हिरवा कपडा टाकून ही बांधकामे राजरोसपणे केली जात असल्याचेही ते म्हणाले. चंदा दो और धंदा लो अशी परिस्थिती आहे. त्यात ठाणे महापालिकेचे सर्वच अधिकारी सहभागी आहेत. यात सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तत्काळ निलंबनाची कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र ती कारवाई होणार नसल्याचेही ते म्हणाले. एकूणच अनाधिकृत बांधकामांना खतपाणी घालण्याचे काम सुरु असून कळवा, मुंब्रा बकाल करण्याचा मनसुबा आखला जात असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या अनाधिकृत बांधकामा संदर्भात एसआयटी लावून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
अनधिकृत बांधकामांना ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग जवाबदार असल्याचा आरोप ही आव्हाड यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही ही बांधकामे उभीच राहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातही काही ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या बांधकामांच्या ठिकाणी देखील पुन्हा बांधकामे उभी राहत असून त्याकडेही कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.