आदिवासींच्या जमिनींवर बेकायदा बांधकामे, काशिमीरा येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 06:35 AM2018-02-02T06:35:54+5:302018-02-02T06:36:04+5:30
स्थानिक नगरसेवक तसेच महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने गुंडांनी दहशत निर्माण करून काशिमीराच्या मांडवीपाडा येथील आदिवासींच्या जमिनीवर बेकायदा बांधकामांचे साम्राज्य उभे केले आहे.
मीरा रोेड - स्थानिक नगरसेवक तसेच महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने गुंडांनी दहशत निर्माण करून काशिमीराच्या मांडवीपाडा येथील आदिवासींच्या जमिनीवर बेकायदा बांधकामांचे साम्राज्य उभे केले आहे. ही बांधकामे तोडून पालिका अधिकारी व संबंधित माफियांवर फौजदारी कारवाईची मागणी जमीन मालक अदिवासी कुटुंबासह मनसेने केली आहे.
मांडवी पाडा येथील मौजे काशी सर्वे क्र. ७४/१ब ही सेंट झेवियर्स शाळेमागे चांगुणा बाबर व कुटुंबीयांची जमीन आहे. ही जमीन आदिवासींच्या मालकीची असून सातबारा उताºयावर तशी नोंद आहे. परंतु या ठिकाणी काही भूमाफियांनी दादागिरी व दहशतीने खोट्या करारव्दारे परस्पर जमिनीच्या काही भागाची विक्री त्रयस्थ नागरिकांना करून टाकली आहे. त्या ठिकाणी झोपडीदादांनी बेकायदा झोपड्या व पक्की बांधकामे केली आहेत. याच भागात शिवशक्ती महिला मंडळानेही कब्जा करुन बेकायदा बांधकाम करत कार्यालय थाटले आहे.
भूमाफिया व स्थानिक नगरसेवकांच्या संगनमताने महापालिकेने येथे पंतप्रधान आवास योजनेखाली घरांचे क्रमांक टाकले आहेत. कराची आकारणी करत बेकायदा वीजपुरवठाही रिलायन्स एनर्जीने केला आहे.
या बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करुन सर्वांवर एमआरटीपीसह अन्य संबंधित कायद्याखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी चागुणा बाबर यांनी महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भेट घेऊन केली आहे.
भाजपा नगरसेवकाचा आशीर्वाद
आदिवासी मालकीची जमीन असून बेकायदा बांधकामे ही स्थानिक भाजपा नगरसेवकांच्या आशीर्वादाने झाली असून पालिका नियमानुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी मनसेचे प्रमोद देठे यांनी केली आहे.
ही बांधकामे जमीनदोस्त करून बेजबाबदार पालिका अधिकारी, रिलायन्स एनर्जी तसेच झोपडीदादांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे देठे म्हणाले .