‘क्लस्टर’द्वारे अनधिकृत दिवाही होणार आता अधिकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:41 PM2020-02-08T23:41:11+5:302020-02-08T23:41:14+5:30
प्रमोद पाटील यांची लगीनघाई । महापालिका आयुक्तांची घेतली भेट, आठ दिवसांत सर्वेक्षण करण्याचे दिले आदेश
ठाणे : अनधिकृत बांधकामांसाठी कुख्यात असलेले आणि याच बांधकामांमुळे पावसाळ्यात तुंबलेल्या दिवावासीयांना अद्यापही पावसाळ्यातील नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसा प्रयत्न वा त्यासाठी पाठपुरावा करण्यात ठाण्यातील एकाही नेत्याने स्वारस्य दाखविलेले नाही. मात्र,आता बिल्डर आणि राजकिय नेत्यांना विशेष रस असलेली मलईदार क्लस्टर योजना दिव्यातही राबविण्यात येणार आहे. यामुळे अनधिकृत असलेले दिवा एकीकडे अधिकृत होण्यास मदत होणार असून दुसरीकडे प्रशासन,बिल्डरांसह राजकिय पुढाऱ्यांचेही चांगभले होणार आहे.
कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी यासाठी पुढाकार घेऊन शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन दिव्यात क्लस्टर योजना राबवण्याची मागणी केली.
दिव्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असल्याने क्लस्टर राबवल्यास दिव्यातील नागरिकांना अधिकृत घरे मिळून मालमत्ताकराच्या माध्यमातून पालिकेचे उत्पन्नदेखील वाढणार असल्याचा दावा लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. येथील बराचसा भाग हा सीआरझेडमध्ये असल्याने येत्या ८ दिवसांत सर्व्हे करून कोणत्या भागात क्लस्टर व्यवहार्य होऊ शकते, याची चाचपणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
गुरुवारी ठाण्यातील किसननगर भागात क्लस्टरचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर, घाणेकर नाट्यगृहात एमएमआरए रिजनमध्येही क्लस्टर राबविण्याबरोबरच त्याचे वेगळे प्राधिकरण करण्याचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानुसार, पाटील यांनी ही मागणी केली. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या ४४ यूआरपीमध्ये दिव्याच्या क्लस्टरचा समावेश असला, तरी सुरुवातीला केवळ पालकमंत्र्यांच्या भागातील क्लस्टरचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतरच आता दिव्याच्या क्लस्टर योजनेच्या हालचालींना वेग आला आहे.
त्रस्त रहिवाशांची होणार सोय : पावसाळ्यात दिव्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यासाठी येथील त्रस्त रहिवाशांना सुरक्षित निवारा देण्याची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले. नागरी सुविधांची वानवा असून क्लस्टर योजना राबवल्यास दिवा भागासाठी नागरी सुविधादेखील मुबलक प्रमाणात मिळतील.
विशेष म्हणजे मालमत्ताकर भरण्यामध्ये दिवा सर्र्वात पिछाडीवर असल्याने क्लस्टरच्या माध्यमातून दिव्यात मोठ्या प्रमाणात घरे निर्माण झाल्यास या कराच्या माध्यमातून पालिकेच्या उत्पनातदेखील भर पडणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
दिवा यूआरपी २०१ हेक्टरचा : ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या ४४ यूआरपीमधील दिवा हे सर्वात मोठे यूआरपी असून २०१ हेक्टर परिसर यूआरपीमध्ये येतो. मात्र, मोठ्या प्रमाणात सीआरझेडचा परिसर असल्याने विकासासाठी केवळ १४ टक्के क्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वात मोठी क्लस्टर योजना असूनही ती किती व्यवहार्य आहे, हे सर्व्हेनंतरच स्पष्ट होईल.