जिल्ह्यातील अनधिकृत गोडाउन रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:59 PM2018-03-27T23:59:39+5:302018-03-27T23:59:39+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी परिसरात अनधिकृत गोडाऊनचे मोठे जाळे आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी परिसरात अनधिकृत गोडाऊनचे मोठे जाळे आहे. या गोडाऊनमध्ये विनापरवानगा जीवघेण्या रासायनिक विस्फोटकांचा साठा होत असल्याचे निदर्शनात आले. यामुळे या गोदामांवर कारवाई करण्याचे सुतोवाच गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सोमवारी केले. या कारवाईची विधान परिषदेत घोषणा होताच जिल्ह्यातील ठिकठिकाणी सरकारी जमिनीवरील व कांदळवन नष्ट करून अनधिकृत गोडाऊन बांधणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहे.
आगीस कारणीभूत ठरणारे ‘रासायनिक स्फोट सर्वाधिक’... आठ महिन्यात ८३ दुर्घटना; जिल्ह्यात ४८ जणांचा मृत्यू’ या मथळ्याखाली १५ मार्च रोजी वृत्तप्रसिद्ध करून लोकमतने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यास अनुसरून विधान परिषदेत चर्चा होऊन भिवंडीतील विस्फोटकांचा साठा करणाºया गोदामांवर कारवाई करण्याचे पाटील यांनी सूचित केले. यामुळे जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरील गोडाऊन जिल्हा प्रशासनासह पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कोणत्याही क्षणी त्यावर कारवाई होऊन ते भुईसपाट होण्याच्या भीतीने गोडाऊन मालक हादरले.
भिवंडी तालुक्यातील कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे आदी महामार्गा लगतच्या गावांजवळ ही अनधिकृत गोडाऊन आहेत. कांदळवन नष्ट करून उभ्या असलेल्या गोडाऊनची यादी प्रशासनाच्या हाती आहेत. यातील १९३ गोडाऊन मध्ये रासायनिक विस्फोटकांचा साठा बिनदिक्कत होत आहे. यातील केवळ चार गोडाऊन मालकांकडे परवाना आहेत. उर्वरित १८९ गोडाऊनमध्ये जीवघेण्या विस्फोटकांचा साठा होत असल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. पण या पेक्षा अन्यही ठिकाणी असलेल्या गोडाऊनमध्ये विस्फोटकांचा साठा होत असल्याचा संशय असल्यामुळे प्रशासन त्यादृष्टीने कारवाईच्या प्रयत्नात आहे.
घातपातास कारणीभूत असलेल्या या रासायनिक विस्फोटकांचा गोडाऊनमध्ये या आधी स्फोट झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यामुळेच या अनधिकृत गोडाऊनमध्ये जीवघेण्या आगीच्या दृर्घना घडून मृत्यूही होत आहेत. रासायनिक स्फोटांमुळे झालेल्या आगींची संख्या जिल्ह्यात अधिक आहेत.