पोलिसांच्या नाकाखाली अनधिकृत जॅमर, वाहनचालकांच्या युक्तीमुळे बुडतोय महसूल, वाढतेय बेशिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 03:47 AM2017-09-28T03:47:13+5:302017-09-28T03:47:20+5:30
रस्त्यालगत उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई होऊ नये, म्हणून काही बहाद्दरांनी ठाणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून स्वत:चेच जामर लावून आपले इप्सीत साधण्याची भन्नाट शक्कल लढविली आहे.
ठाणे : रस्त्यालगत उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई होऊ नये, म्हणून काही बहाद्दरांनी ठाणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून स्वत:चेच जामर लावून आपले इप्सीत साधण्याची भन्नाट शक्कल लढविली आहे. वाटेल तिथे वाहने उभी करताना हे बहाद्दर स्वत:च जॅमर लावून ते वाहतूक शाखेचे असे भासवित आहे. वाहतूक अशा वाहनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शासनाचा महसूल मात्र बुडत आहे. एवढेच नव्हे तर चोरांकडूनही अशा वाहनांचे एक प्रकारे रक्षण होत आहे.
ठाण्यात पार्किंगची मोठी समस्या आहे. जागाच उपलब्ध नसल्याने रस्त्याच्याकडेलाच वाहने उभी केली जात आहेत. यामुळे कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांची सतत धडक कारवाई सुरू असते. टोर्इंग व्हॅन शहरात फिरवून ते मोटरसायकलसारख्या लहान गाड्या टोर्इंग करून नेतात. परंतु, टोर्इंग व्हॅनवर जागेचा अभाव असल्याने रस्त्यालगत अनधिकृत पार्क केलेल्या चारचाकी आणि त्यापेक्षा मोठ्या वाहनांना ते आहे त्याच जागेवर जॅमर लावून त्यांच्या मालकांकडून दंड वसूल करतात. एका गाडीसाठी १०० रु पये आणि त्यानंतर प्रत्येक तासाला ५० रु पयांचा दंड आकाराला जातो. शिवाय कागदपत्रे नसल्यानेही तो भरावा लागतो. त्यामुळे अनधिकृत पार्किंग करणाºया चारचाकी गाडी चालकांना मोठा भुर्दंड असून त्यांचा वेळही वाया जातो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून अशा अनधिकृत पार्किंगवर काही चालकांनी चांगलाच उतारा शोधून काढला आहे. तो म्हणजे स्वत:ची गाडी हवी तिथे उभी करायची, तिला घरून सोबत आणलेले जॅमर लावायचे अन आपली कामे उरकायची. पोलिसांची टोर्इंग व्हॅन अशा वाहनाजवळ आली तर गाडीचा जॅमर पोलिसांचा आहे की अन्य कुणाचा याची खातरजमा न करताच ते त्याकडे दुर्लक्ष करून पुढे मार्गस्थ होतात. एवढेच नाहीतर अशी पार्क केलेली गाडी रात्रभरही त्याच जागेवर बेवारस म्हणून राहिली तरी तिच्या चाकाला लावलेले जॅमर बघून पोलिसांसह चोरांकडूनही तिला अभय मिळते. शहरात रस्त्याच्या कडेला,सोसायट्यांच्या आवाराबाहेर अशा जॅमर लावलेल्या गाड्या उभ्या असलेल्या पाहायला मिळतात.
बाजारात दीड हजारात मिळतो जॅमर
याबाबत वाहतूक पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. नौपाडा येथील अत्रे कट्टयासमोरही अशाच प्रकारचा जॅमर लावलेली मारु ती व्हॅन गेल्या काही दिवसांपासून बिनधास्तपणे उभी केलेली आहे. विशेष म्हणजे ती व्हॅन दुसºया दिवशीही जवळच दुसºया ठिकाणी लावल्याचे दिसून आले. वाहतूक शाखेकडून गाड्यांना जॅमर लावताना तो चालकाला दिसावा म्हणून तो पुढच्या चाकालाच लावला जातो.
परंतु, या व्हॅनला मागील चाकाला लावण्यात आला होता.अशी चुक पोलीस कधीच करीत नाहीत,असे एका अधिकाºयाने सांगितले. शिवाय असे जॅमर बाजारात १२०० ते १५०० रु पयांना मिळतात. त्यामुळे काही चालक कारवाई टाळण्यासाठी स्वत:च असे जॅमर लावतात. हे ही त्या अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर कबूल केले.