भाईंदरच्या माजी भाजपा नगरसेवकाच्या अनधिकृत लॉज अन् बारला आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 01:54 PM2020-12-02T13:54:49+5:302020-12-02T13:54:54+5:30

भाईंदर पूर्वेला नवघर मार्गावर दोन मजली ओम साई लॉज व मेहंदी बार आहे . सदर बार व लॉज ला बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भीषण आग लागली .

Unauthorized lodge of former BJP corporator of Bhayander set on fire | भाईंदरच्या माजी भाजपा नगरसेवकाच्या अनधिकृत लॉज अन् बारला आग 

भाईंदरच्या माजी भाजपा नगरसेवकाच्या अनधिकृत लॉज अन् बारला आग 

Next

मीरारोड - भाईंदर पूर्व येथील अनधिकृत लॉज व बार ला बुधवारी पहाटे भीषण आग लागली . सदर अनधिकृत लॉज व बार हा भाजपाचे माजी नगरसेवक यशवंत कांगणे ह्यांचा असून त्यांच्या पत्नी मीना ह्या प्रभाग समिती सभापती आहेत . भाईंदर पूर्वेला नवघर मार्गावर दोन मजली ओम साई लॉज व मेहंदी बार आहे . सदर बार व लॉज ला बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भीषण आग लागली . सदर आग इतकी भीषण होती कि इमारतीच्या दुसऱ्या मजल्या पर्यंत आगीचे लोळ उठले . 

भाईंदर पश्चिमेच्या अग्निशन दलास आगीच्या घटनेची वर्दी मिळाली . आगीची भीषणता पाहता सिल्वर पार्क व कनकिया येथून सुद्धा अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यास पोहचले . उपस्थानाक अधिकारी सदानंद पाटील , लिडिंग फायरमन संजय मोरे , विठ्ठल भाबल , फायरमन वासुदेव भोईर , जयकुमार पाटील, समाधान माळी , दर्पण पाटील प्रसाद तांडेल ऋषभ पाटील , दिनेश वैष्णव आदींनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरवात केली . चार अग्निशामक बंबच्या सहाय्याने दिड तासांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले . 

आग हि तळ मजल्या सह पहिल्या व दुसऱ्या मजल्या पर्यंत पसरली होती . धुराचे लोट आणि आगीच्या उंच ज्वाळा ह्या मुले परिसरात घबराट माजली . शिवाय सदर बार - लॉज ला लागून असलेल्या एका स्टील भांड्याच्या गोदामास देखील आगीची झळ बसली . तळ मजल्यावरील बारचे दर्शनी भागाचे शटर हे चावी नसल्याने ते तोडून आतील आग विझवावी लागली . आतील गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले शिवाय मद्याचा साठा बाबत समजू शकले नाही . आतील सामान साहित्य मोठ्या प्रमाणात जाळून खाक झाले . आग हि पहाटेच्या वेळी लागल्याने सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही . तर आगीत लॉज - बार चे सुमारे २२ लाखांचे नुकसान झाल्याचे मालक यशवंत कांगणे यांनी अग्निशमन दलास सांगितल्याची नोंद आहे . 

वास्तविक सदर ओम साई लॉज आणि बार हे अनधिकृत बांधकामात असून दोन वर्षां पूर्वी पालिकेने त्यावर तोडक कारवाई केली होती .शिवाय सदर लॉज मधून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्या प्रकरणी कांगणे आदींवर पिटा कायद्याखाली गुन्हा दाखल आहे . परंतु कांगणे हे आधी नगरसेवक तर आता त्यांच्या पत्नी मीना ह्या नगरसेवक असून पालिकेत भाजपाची सत्ता असल्याने सदर अनधिकृत लॉज व बार वर ठोस तोडक कारवाई केली जात नाही . उलट संरक्षण दिले जात असल्याचे आरोप होत आले आहेत .

Web Title: Unauthorized lodge of former BJP corporator of Bhayander set on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.