कळव्यातील अनाधिकृत कार्यालयाचे आव्हाडांनी ट्विट करावे; आनंद परांजपे यांचे आव्हान
By अजित मांडके | Published: May 28, 2024 04:53 PM2024-05-28T16:53:07+5:302024-05-28T16:55:42+5:30
जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचे अनधिकृत शरद पवार गटाचे कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावे असे आव्हान अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे.
अजित मांडके,ठाणे : पुणे अपघात प्रकरणी अजित पवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे व राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही जितेंद्र आव्हाड हे खोटे आरोप करीत आहेत. उलट अजित पवार यांनी आव्हाडांच्यासाठी दोन-दोनदा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता हे ते विसरलेले दिसतात. जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचे अनधिकृत शरद पवार गटाचे कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावे असे आव्हान अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे.
ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नितेश राणे आणि निलेश राणे यांनी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे, अंजलीताईंनी ॲक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणे बंद करावे, असेही ते यावेळी म्हणाले. माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे की याच अजित पवार साहेब यांनी आपल्यासाठी ज्यावेळी ३५४ गुन्हा दाखल झाला. त्यावेळी आपल्यासाठी देखील ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता, की आपण व्हिडिओ पूर्ण न बघता, चौकशी न करता आमचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ चा गुन्हा कसा दाखल केलात ? हे आपण विसरलात का ? हरहर महादेवच्या वेळेला ज्यावेळेला तुम्हाला, आम्हाला, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनने अचानकपणे नेले होते, त्यावेळी देखील अजित पवार यांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांना फोन केला होता. मात्र कुठेही केव्हाही अजित पवार यांचा संबध जोडण्याचे काम आव्हाडांकडून केले जात असल्याचेही ते म्हणाले.
मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात येणे चुकीचे-
लोकसभा निवडणुकीनंतर सर्व मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री माननीय छगन भुजबळ यांनी मतुस्मृतीचा मुद्दा उपस्थित केला होता. पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलणार आहेत की, अशाप्रकारे मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात येणे हे चुकीचे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा विरोधच करेल असेही ते म्हणाले.