संपत्तीच्या हव्यासातून केला काकाचा खून, केअर टेकर म्हणून काम करत होता पुतण्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 06:10 IST2025-01-23T06:09:54+5:302025-01-23T06:10:39+5:30
Thane Crime News: संपत्तीच्या लोभातूनच डॉ. मुकेशकुमार यांची त्यांच्याच पुतण्याने पैशाच्या हव्यासातून हत्या केल्याचा उलगडा ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला.

संपत्तीच्या हव्यासातून केला काकाचा खून, केअर टेकर म्हणून काम करत होता पुतण्या
- जितेंद्र कालेकर
ठाणे - एकाकी राहणाऱ्या डॉ. मुकेशकुमार श्यामसुंदर कुमार (वय ६०) यांचा मृतदेह एका बॅगेत वरप भागात मिळाला होता. तीन महिन्यांनी मुलाने वडील बेपत्ता असल्याची तक्रार कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली. केवळ संपत्तीच्या लोभातूनच डॉ. मुकेशकुमार यांची त्यांच्याच पुतण्याने पैशाच्या हव्यासातून हत्या केल्याचा उलगडा ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला.
वरप गावाच्या कचरापट्टीत १५ ऑगस्ट २०२४ रोजी कल्याण तालुका पोलिसांना एका बॅगेत एक अनोळखी मृतदेह सापडला. बॅगेत काही विषारी औषधाची पाकिटेही मिळाली. मृतदेहाची ओळख पटवून खुनातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि कल्याण तालुका पोलिसांची दोन स्वतंत्र तपास पथके तयार केली. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
विषारी औषधांमुळे मेडिकल दुकानात चौकशी
बॅगेतील विषारी औषधांमुळे मेडिकल दुकानांमध्येही चौकशी केली. फोटोच्या आधारे तपास पथकाने शाेध सुरू केला. मात्र, धागादोरा लागत नव्हता.
अखेर हा मृतदेह गोदरेज हिल, खडकपाडा भागातील डाॅ. मुकेशकुमार यांचा असून, त्यांचाच पुतण्या अथर्वने हा खून केल्याची माहिती खबऱ्याकडून हवालदार प्रकाश साईल यांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे, उपनिरीक्षक महेश कदम यांच्या पथकाने आणखी माहिती काढली. डॉ. मुकेशकुमार हे मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी होते.
अर्धांगवायूमुळे त्यांना चालताही येत नव्हते. कौटुंबिक वादामुळे पत्नी आणि लहान मुलगा जयराेश ठाण्यात राहतात. मोठा मुलगा अबरोश आणि मुलगी परदेशात होती. वडील संपर्कात नसल्यामुळे जयराेशनेच खडकपाडा पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार ७ नोव्हेंबर २०२४ रोजी दाखल केली. त्यांचा पुतण्या अथर्व तेजस्वी हाच त्यांच्या देखभालीचे काम करायचा. अथर्व आणि त्याचे वडीलही मुकेश यांच्याकडे यायचे.
संगोपनाला होता कंटाळलेला
केअर टेकर म्हणून काम पाहणारा त्यांचा पुतण्या तेजस्वी ऊर्फ ओम अजयकुमार मिश्रा (१६) आणि त्याचे वडील अजयकुमार मिश्रा (५४) हेच खुनी असल्याची माहिती उघड झाल्यानंतर त्यांना अटक केली. त्याच्या निवृत्तीचे पैसेही तेजस्वी परस्पर ऑनलाइन घ्यायचा.
त्यांच्या संगोपनाला तो कंटाळला होता. त्यातून त्यांच्यामागे कोणी नसल्याने त्यांची मालमत्ताही मिळेल, या हव्यासापोटी त्यानेच त्यांना रोज थोडे थोडे विषारी औषध दिले. यातच त्यांचा मृत्यू झाल्याने मृतदेह घरातच ठेवला.
त्यानंतर बिंग फुटेल या भीतीने एका बॅगेत भरून त्याची विल्हेवाट लावल्याची कबुलीच तेजस आणि अजयकुमार यांनी दिली. त्यांच्या खुनानंतरही तेजस त्यांच्या निवृत्तीचे पैसे खर्च करीत हाेता, असेही तपासात उघड झाले.