कल्याण-मुरबाड रोडवरील पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:05+5:302021-08-28T04:44:05+5:30
कल्याण : कल्याण-मुरबाड रोडवरील कांबा, पाचवा मैल, नवथरपाडा, वाघेरापाडा, पावशेपाडा या पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांचे ...
कल्याण : कल्याण-मुरबाड रोडवरील कांबा, पाचवा मैल, नवथरपाडा, वाघेरापाडा, पावशेपाडा या पाच गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा करावा, याकडे उल्हास नदी बचाव समितीने लक्ष वेधले आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत कृती आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत दिले आहेत. पाणी आणि स्वच्छता मिशनची ही दुसरी बैठक होती. जलजीवन मिशन हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी उद्दिष्ट आखून दिले आहे. कोरोनाची साथ आणि पावसाळा यामुळे उद्दिष्टपूर्तीस विलंब होत आहे. या बैठकीच्या धर्तीवर उल्हास नदी बचाव समितीने कल्याण-मुरबाड रोडवरील पाच गावांना जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. या गावांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रकल्पाचे काम लवकर मार्गी लावा
विशेष म्हणजे उल्हास नदी बारमाही जलस्त्रोत आहे. या नदीतून अनेक लोक पाणी उचलतात. मात्र, या नदीत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. तेच पाणी प्रक्रियेविना संबंधित गावपाड्यांतील रहिवासी पीत आहेत. या ठिकाणी एक जलशुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, तो पूर्णत्वास आलेला नाही. त्याचे काम लवकर मार्गी लावावे, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. समिती गेल्या अनेक वर्षांपासून नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे.
---------------------